भाजपविरोधी आघाडीसाठी शिवसेनेला साद

भाजपविरोधी आघाडीसाठी शिवसेनेला साद

मुंबई - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी उभारलेल्या एकत्रित आघाडीत शिवसेनेनेही सामील व्हावे, असा प्रस्ताव काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने समोर आणला आहे. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आणल्यास मुंबई, मराठवाडा वगळता अन्य जागांवर शिवसेनेने छुपा पाठिंबा द्यावा, असा पर्यायही पुढे करण्यात आला आहे.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा, तसेच विधानसभा निवडणुकीत एकत्रित आघाडी उभारताना भाजपचा पाडाव हे एकमेव सूत्र समोर ठेवले आहे. शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा नारा दिला असल्याने त्यांना आपल्या गोटात घेण्यासाठी काँग्रेसमधील एक गट उत्सुक आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबई विभागात त्यांना योग्य त्या जागा देण्याची तयारी काँग्रेसने दाखवली आहे. या जागा वगळून अन्य भागात शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला समर्थन द्यावे, असा प्रस्तावही समोर मांडण्यात आला आहे. मराठवाड्यातील शिवसेनेच्या जागांवर त्यांना योग्य ती मदत देण्याची तयारीही काँग्रेसने दाखवली असल्याचे समजते. शिवसेना हा हिंदुत्वनिष्ट पक्ष आहे, शिवाय त्यांचा मराठीचा आग्रह आपल्या कोष्टकात बसत नाही, यावरही काँग्रेसच्या उच्चस्तरीय वर्तुळात चर्चा झाली. मात्र भाजपला थांबवणे हा या निवडणुकीतला सर्वांत मुख्य मुद्दा असल्याने या धोरणात्मक फरकाची नोंद प्रांजळपणे देत जागाविषयक तडजोडी कराव्यात, हा विचार काँग्रेसच्या नेतृत्वाने मान्य केला असल्याचेही समजते. मतविभाजनाचा लाभ घेणे सत्ताधारी पक्षाला सोपे असल्याने विभाजन टाळून तिरंगी लढती थांबवण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडे पाठवण्यात आला असल्याचेही सांगण्यात येते. महाआघाडी हा काँग्रेसचा नारा आहे, बिहार तसेच अन्य राज्यांत महाआघाडीची वाट चोखाळणाऱ्या मोहनप्रकाश यांच्याकडे महाराष्ट्राचा प्रभार असल्याने हा विचार काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापर्यंत गेला असल्याचीही माहिती एका उच्चस्तरीय नेत्याने दिली. गुरुदास कामत, संजय निरूपम या दोन काँग्रेस नेत्यांचे परस्परांशी पटत नसल्याने मुंबईत पक्षाला फारसे काही मिळणार नाही, तसेच ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा गड भेदता येणार नाही याची जाणीव असल्याने शिवसेनेला सामावून घेणे कठीण नसल्याचेही या गटाचे म्हणणे आहे.

माजी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार
शिवसेनेशी जवळचे संबंध असलेल्या एका माजी मुख्यमंत्र्याने हालचाली सुरू केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला या संदर्भात विश्‍वासात घेण्यात आले आहे. शिवसेना हा प्रस्ताव मान्य करेल काय, असे विचारले असता एका ज्येष्ठ काँग्रेसनेत्याने, त्यांचा मोदीविरोध आमच्याएवढाच तीव्र आहे आणि असा समान धागा राजकारणात महत्त्वपूर्ण ठरतो, अशी पुस्तीही या नेत्याने जोडली. या संदर्भात शिवसेनेशी संपर्क साधला असता पक्षप्रमुखच यासंबंधी बोलू शकतील असे सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com