चंद्रकांतदादांकडून भाजप प्रवेशासाठी ऑफर - हर्षवर्धन जाधव

चंद्रकांतदादांकडून भाजप प्रवेशासाठी ऑफर - हर्षवर्धन जाधव

मुंबई - माझ्यासह 25 आमदारांना भाजप प्रवेशासाठी ऑफर दिली होती. गेल्या महिन्यातील दौऱ्यात चंद्रकांत पाटील यांनी ऑफर दिली, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवधन जाधव यांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तसेच निवडून न आल्यास विधान परिषदेवर घेऊ; इतकंच नाही तर निवडणुकीचा सगळा खर्च आम्ही करू, अशी ऑफरही भाजपने दिल्याचा दावा हर्षवर्धन जाधव यांनी केला. यामुळे आगामी काळात लोकप्रतिनिधी फोडाफोडीवरून शिवसेना आणि भाजपत रणंकदन सुरू होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, भाजपने आमदार जाधव यांचे आरोप फेटाळून लावले आहे. 

जाधव यांच्या म्हणण्यानुसार, शिवसेना आणि भाजपतील कुरबुरींमुळे भाजप त्रस्त असल्याचे चंद्रकांतदादा म्हणाले होते. त्यामुळे शिवसेनेचे काही आमदार गळाला लागतात का, यासाठी प्रत्येक आमदाराला पाच कोटींची ऑफर देऊन, त्यांना पोटनिवडणुकीत निवडून आणू आणि त्यांना भाजपमध्ये घ्यायचे व शिवसेनेला बाजूला सारायचे, असा प्रयत्न असल्याचे चंद्रकांतदादा म्हणाले. तिच ऑफर त्यांनी मलाही (जाधव यांना) दिली होती. तुमच्या बदल्याप्रकरण असेल, कोणाच्या बदल्या करायच्या असतील, तर सगळे सांगा आणि तुम्ही राजीनामा द्या. तुम्ही पोटनिवडणूक लढा आम्ही तुम्हाला निवडून आणू, पैसे खर्च करू, अशा पद्धतीने मग तुम्ही आमच्यात सामील व्हा. अशा पद्धतीने शिवसेनेचे इतर आमदारही सहभागी झाले, तर शिवसेनेच्या दररोज होणाऱ्या त्रासातून आम्ही मुक्त होऊ, असे ते म्हणाले. त्यांनी ही ऑफर शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना दिलेली असे मला वाटते. कारण ते (चंद्रकांतदादा) बोलत असताना तसेच मला म्हणाले, आम्ही सगळ्यांनाच ऑफर देतोय. आमचे हेच म्हणणे आहे, की तुम्ही पैसे घ्या, राजीनामा द्या, निवडणूक लढा, आम्ही भाजपच्या तिकिटावर तुम्हाला निवडून आणतो. निवडून आणल्यानंतर आम्हाला शिवसेनेला दूर करता येईल. शिवसेनेच्या सगळ्याच आमदारांना ही ऑफर दिल्याचे वाटते. पण शिवसेनेचा कोणताही आमदार गळाला लागेल असे मला वाटत नाही, असे हर्षवर्धन जाधव यांनी नमूद केले. 

जाधव यांच्या गौप्यस्फोटासंदर्भात खासदार संजय राऊत म्हणाले, "जे सत्य सांगितले आहे. मुळात त्यांना सरकार व्यवस्थित चालू असताना घोडेबाजार करण्याची गरज का वाटते? ज्या संबंधित मंत्र्यांवर आरोप केले. त्यांची सरकार चौकशी करेल तेव्हा करेल. पण शिवसेनेच्या संदर्भात आणि इतर पक्षांच्या संदर्भात भाजपचे जे खासदार आणि इतर नेते ईडीकडे किंवा इतर तपास यंत्रणेला पत्र लिहीत असतात. त्यांच्यासाठी हर्षवर्धन जाधव आणि चंद्रकात पाटील ही एक फिट केस आहे. 

भाजपने आरोप फेटाळले 
आमदार हर्षवर्धन जाधव यांचे आरोप भाजपने फेटाळले असून, केवळ अपयश लपविण्यासाठी जाधव यांच्याकडून ही नौटंकी केली जात असल्याची टीका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केली आहे. जाधव यांनी केलेला आरोप बिनबुडाचा आहे. असले उद्योग करण्याची भाजपला कसलीच गरज नाही. आमचा कोणत्याही पक्षाच्या आमदारावर डोळा नसून भाजपकडे चांगल्या कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे. आपले अपयश झाकण्यासाठीच जाधव हे नाटक करत असल्याचा टोला माधव भंडारी यांनी लगावला आहे. 

सीबीआय चौकशी करा - धनंजय मुंडे 
पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपवर जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक ते आमदारांना करोडो रुपये देऊन खरेदी करण्याबाबतचे आरोप होत आहेत. आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही अशाच प्रकारे केलेला आरोप हा गंभीर असून, या सर्व आरोपांची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com