गावगाड्यातून चावडीचा अस्त

गावगाड्यातून चावडीचा अस्त

टाकवे बुद्रुक  - गावाच्या इतिहासाची साक्षीदार असलेली वास्तू... सुखदु:खाच्या चर्चेचे ठिकाण... सुटीत मुलांच्या बागडण्याची हक्काची जागा... सांजवेळी वडीलधाऱ्यांच्या गप्पांची मैफल जमण्याचा हमखास कट्टा...होय गावाची चावडीच ती... हीच चावडी आता गावातून हद्दपार होऊ लागली आहे. गावाच्या बदलत्या सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतरांमधून चावडीचे महत्त्व लोप पावले. सरकारी भाषेत तिचे अस्तित्व असले तरी नव्या पिढीला चावडी दाखविण्यासाठी छायाचित्रांमधूनच सांगावे लागेल, अशी परिस्थिती आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून गावातील चावडीला परंपरा आहे. गावात आलेला लखोटा चावडीत वाचून दाखवला जायचा. त्यावर चर्चा होऊन एकमताने दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी व्हायची. गावकामगार तलाठी, पाटील, मामलेदारांची बैठक चावडीतील ओसरीत बसायची. तेथेच शेतसारा गोळा केला जायचा. चावडी त्या गावच्या संपर्काचे प्रमुख ठिकाण होते.

गावाच्या मध्यावर बांधलेली चावडीत सकाळच्या पहिल्या प्रहरापासून गजबजलेली असायची. गावातील झाडून सर्व मुले आट्यापाट्या, लगोरी, पकडापकडी, रुमालपाणी, लपाछपी खेळायची. दिवसभर मुलांच्या किलबिलाटात रमलेली चावडी, सायंकाळी गप्पांच्या मैफलीत रंगून जायची. दसरा, दिवाळी, शिमग्यात, रंगपंचमीच्या रंगात न्हाऊन जायची.

गावातील लग्नाच्या वराती चावडी पुढच्या मैदानात व्हायच्या. पूर्वी गावात सोयरीकीला आलेला पाहुणा गावातील चावडीवरून गावाच्या चालीरीतींचा अंदाज बांधायचा. गावात आलेल्या नव्या सुनबाईची पावले पहिली चावडीला लागायची. दशक्रियेच्या पंगती चावडीतच उठायच्या. 

गावातील चावडीचे महत्त्व ऐंशीच्या दशकापर्यंत अबाधित होते. कालांतराने गावागावांत राजकीय गट वाढले. पक्षीय राजकारण गावातून उंबरठ्यावर पोचले. चावडीत सुखदु:खांच्या गप्पांची मैफल संपली. शहकाटशहाच्या राजकारण झडू लागले. चावडी दुर्लक्षित होऊ लागल्या. गावागावांत विकास योजनांच्या नावाखाली समाजमंदिर आणि सभामंडपे वाढू लागली. आता स्मार्टफोन आणि व्हिडिओ गेमचे लोन खेडोपाडी पोचल्याने हे लहान मुलांचे खेळही कालबाह्य झाले. त्यामुळे मुलेही चावडीवर फिरकेनासी झाली. मात्र, जी मौजमजा चावडीत होती, आताच्या सभामंडपात नसल्याचे जुनी पिढी आवर्जून सांगते. मावळात बहुतेक गावांत चावडी आहे. वडगाव मावळ या तालुक्‍याच्या ठिकाणी चावडीचा उपयोग गावकामगार तलाठी व मंडलाधिकाऱ्यांना बसायला होतो. आंदर मावळातील अनसुटेच्या चावडीचे दगड निखळले आहेत. जुन्या पिढीतील गावकऱ्यांनी श्रमदानातून उभ्या केलेल्या इमारतीचे इमले आता पडू लागले आहे. काही गावांनी चावडी जपून त्यात शक्तीचे प्रतीक असलेल्या मारुतीरायांच्या मूर्तीची स्थापना केली आहे. कांब्रे, कुसवली, कुणे, माळेगाव बुद्रुक आदी गावांचा त्यात उल्लेख करावा लागेल. काळाच्या पडद्याआड लोप पावणाऱ्या चावडी, कोंडवाडे, पाऊलवाटा, गायराने जपण्याची वेळ आली आहे. अन्यथा पुढच्या पिढीला या सगळ्या गोष्टी चित्रांतूनच दाखवायला लागतील.

सरकार दरबारी चावडी कायम
काळाच्या ओघात चावडी बाजूला सरली असली तरी सरकारी दप्तरातून चावडी शब्द बाजूला करता आला नाही. जिल्हा परिषदेने प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे लिखाण, वाचन तपासणीचे कामच गावकऱ्यांवर सोपवले असून चावडी वाचन हा प्रकल्प सुरू केला. सातबारा वाचनाचा उपक्रमही राबविला जातो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com