कुठवर सोसायचं या वयात... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जुलै 2017

मुंबई - ""कुठवर सोसायचं या वयात... पवार साहेब या वयात किती कष्ट घेतात... खरं तर या वयात पवार साहेबांना मदत करायला पाहिजे; मात्र मीच त्यांना त्रास देतोय. बरं दुसरं असं, की कॅन्सर सोडून बाकी सगळे आजार जडलेत मला... पवार साहेब, सुप्रिया यांना माझा नमस्कार सांगा...'' अशा आर्त शब्दांत माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी सोमवारी विधान भवनात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मोजक्‍या नेत्यांसमक्ष आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. 

बेहिशेबी मालमत्ता आणि संपत्तीच्या कारणावरून भुजबळ सध्या तुरुंगात आहेत. सक्तवसुली संचालनालय त्यांची कसून चौकशी करत आहे. त्यामुळे ते राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या मतदानाला येतील की नाही, याबाबत त्यांच्या समर्थकांना शंका होती. अखेर कडेकोट बंदोबस्तात रुग्णवाहिकेतून त्यांना पोलिसांनी विधान भवनात आणले. भुजबळ येणार असल्याची कुणकुण लागल्याने भरपावसात विधान भवन आवारात माध्यमांचे प्रतिनिधी हजर होते. अखेर भुजबळ आले आणि ते मतदानासाठी आत गेले. मतदान केल्यानंतर ते तास- दीड तास विधान भवनात होते. सभापतींच्या दालनात त्यांनी जेवण केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड, प्रकाश गजभिये, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आदी त्यांच्यासोबत होते. यानंतर बाहेर गेलेले अजित पवार परतले. 

या सगळ्यांशी बोलताना भुजबळांचा स्वर आर्त झाला. ते म्हणाले की, मी रोज सगळी वर्तमानपत्रे वाचतो. तुम्ही लोक पक्षासाठी झटत आहात, हे वाचून समाधान वाटते. या वयातही पवार साहेब इतके कष्ट घेतात. खरे तर मी या वयात त्यांना मदत करायला हवी. मात्र, मी त्रासच देतोय. मला हे सहनही होत नाही. आता काय सांगू, कॅन्सर सोडून बाकी सर्व आजार जडलेत, असे भुजबळ बोलत असताना "राष्ट्रवादी'चे उपस्थित नेतेही गंभीर झाले. पवार साहेब, सुप्रिया यांना नमस्कार सांगा, असे म्हणत भुजबळ विधान भवनाबाहेर आले आणि रुग्णवाहिकेत बसले. एकेकाळची मुलुखमैदान तोफ असलेले भुजबळ भलतेच धीरगंभीर आणि दमलेले दिसत होते. बाहेर भुजबळ यांचे समर्थक घोषणा देत होते. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रमेश कदम यांना पोलिसांच्या वाहनातून विधान भवनात मतदानासाठी आणले होते.

Web Title: maharashtra news chhagan bhujbal NCP