कोळसा महागल्याने पुन्हा वीज दरवाढ 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 10 जानेवारी 2018

मुंबई - "कोल इंडिया लिमिटेड'ने कोळशाच्या दरात 9 टक्के वाढ केल्याने राज्यातील विजेचे दर वाढण्याची शक्‍यता आहे. विजेच्या प्रतियुनिटमागे सरासरी 20 ते 22 पैसे दरवाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्य वीज नियामक आयोगाच्या मंजुरीनंतरच ही रक्कम "महावितरण'च्या माध्यमातून वसूल केली जाईल. 

"महानिर्मिती'ला हे वाढीव इंधनदर वसुलीसाठी राज्य वीज नियामक आयोगाची परवानगी घ्यावी लागणार आहे. "महानिर्मिती'तर्फे दरवर्षी "कोल इंडिया लिमिटेड'कडून 45 ते 50 दशलक्ष टन कोळसा राज्यातील वीज प्रकल्पांसाठी विकत घेतला जातो. दरवाढीमुळे सरकारी प्रकल्पांना मोठ्या प्रमाणात झळ बसणार आहे. इंधन दरवाढीतील चढउतारानुसार "फ्युएल एडजेस्टमेंट कॉस्ट' (एफएसी)ही ग्राहकांकडून वसूल करण्याची मुभा वितरण कंपन्यांना असते. त्या संदर्भात वीजनिर्मिती कंपनीला केवळ राज्य वीज नियामक आयोगाला माहिती द्यावी लागते. कोळशाची दरात झालेली वाढ लवकरच ग्राहकांच्या खिशातून वसूल केली जाणार आहे. याबाबत "महानिर्मिती'कडून "महावितरण'ला अंदाजित रक्कम "एफएसी' वसुलीसाठी सांगण्यात येईल. त्यानंतर ग्राहकांकडून "एफएसी'च्या स्वरूपात ही रक्कम वसूल केली जाण्याची शक्‍यता आहे. सध्या महानिर्मितीला कोळसा पुरवठादार कंपन्यांपैकी "कोल इंडिया लिमिटेड'मार्फत सर्वाधिक कोळसा पुरवला जातो. 

Web Title: maharashtra news coal electricity