सरकारी धोरणात दडलेले कॉंग्रेस विजयाचे पैलू 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

मुंबई - सततच्या भव्यदिव्य विजयाची सवय जडलेल्या भारतीय जनता पक्षाला नांदेड महापालिका निवडणुकीने दणदणीत पराभवाचा चेहरा दाखवला आहे. नांदेड महापालिकेत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा करिष्मा असला, तरी कॉंग्रेसला मिळालेले यश हे त्याहून अधिक मोठे असल्याने, या निकालाच्या मागे सरकारी धोरणाचे पैलू दडल्याचे मानले जात आहे. 

मुंबई - सततच्या भव्यदिव्य विजयाची सवय जडलेल्या भारतीय जनता पक्षाला नांदेड महापालिका निवडणुकीने दणदणीत पराभवाचा चेहरा दाखवला आहे. नांदेड महापालिकेत कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांचा करिष्मा असला, तरी कॉंग्रेसला मिळालेले यश हे त्याहून अधिक मोठे असल्याने, या निकालाच्या मागे सरकारी धोरणाचे पैलू दडल्याचे मानले जात आहे. 

नोटाबंदीने सामान्यांचे झालेले हाल, जीएसटीमुळे व्यापारीवर्गातली प्रचंड नाराजी अन्‌ शेतकरी कर्जमाफीची किचकट व जाचक अंमलबजावणी या तीन प्रमुख विषयांची किनार निवडणुकीला लाभल्याचे नाकारता येत नाही. मागील निवडणुकांत कॉंग्रेसची राज्यात सत्ता असतानाही जेमतेम 42 जागा मिळाल्या होत्या. आता देशभरात कॉंग्रेसची वाताहत सुरू असताना नांदेडचा विजय कॉंग्रेसला संजीवनी देणारा ठरल्याचे चित्र आहे. ही निवडणूक सरळ सरळ भाजप विरुद्ध कॉंग्रेस अशीच होती. भाजपकडे सत्ता, वक्‍ता व कार्यकर्त्यांची भक्‍कम फळी होती. याउलट कॉंग्रेसकडे केवळ अशोक चव्हाण हा चेहरा. 

केंद्र व राज्य सरकारच्या तीन वर्षांतल्या कारभाराचे सरळ सरळ पडसाद या निवडणुकीत उमटल्याचे नाकारता येत नाही. नोटाबंदी झाल्यानंतर एक वर्ष लोटले तरी काळा पैसा व अर्थव्यवस्थेची ऊर्जितावस्था समोर आलेली नाही. नोटाबंदीने सामान्य नागरिकांसह सर्वांचीच आर्थिक कोंडी झाली होती. या कोंडीचे स्वागत जनतेने सुरवातीला केले. मात्र, त्याचे सकारात्मक परिणाम दिसले नाहीत म्हणून केंद्र व राज्य सरकारवरील सामान्य जनतेच्या विश्‍वासाला तडा गेल्याचे मान्य करावे लागेल. 

जीएसटीच्या जाचक अंमलबजावणीने व्यापारीवर्गात कमालीची नाराजी आहे. जीएसटीनंतर पहिल्यांदाच ही मोठी निवडणूक होती. व्यापारीवर्गानेही भाजपकडे पाठ फिरवल्याचे येथे स्पष्टपणे दिसले. तर, नांदेड महापालिका असली तरी ग्रामीण व शेतकरीवर्गावर या शहराची अर्थव्यवस्था मोठी आहे. त्यातच कर्जमाफीच्या सुरू असलेल्या जाचक प्रक्रियेवरून या वर्गातही मोठी नाराजी होती. 

भाजपविरोधात सपशेल कौल 
सामान्य नागरिक, व्यापारी व शेतीशी निगडित वर्गाने येथे भाजपविरोधात सपशेल कौल दिल्यानेच कॉंग्रेसला प्रचंड मोठा विजय मिळवता आला हे स्पष्ट आहे. 

मागील निवडणुकांत एमआयएम (11), राष्ट्रवादी (10) व शिवसेनेला (14) जागा मिळाल्या होत्या. हे तीनही पक्ष या वेळी अक्षरश: हद्दपार झाले. त्यामुळे, भाजपला कॉंग्रेस हाच पर्याय असून सरकारविरोधी धोरणांचा रोष नांदेडकरांनी प्रकर्षाने व्यक्‍त केल्याची ही सणसणीत प्रतिक्रिया असल्याचे निकालांवरून दिसते.

Web Title: maharashtra news congress