छळ केल्यास मुलांना घराबाहेर काढण्याचा अधिकार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

मुंबई - वृद्ध आई-वडिलांची देखभाल न करता त्यांचा छळ करणाऱ्या मुलांना, सुनांना घराबाहेर काढण्याचा अधिकार आई - वडिलांना आहे, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने यासंबंधितांच्या कायद्याबाबत अधिकाधिक जनजागृती करून ज्येष्ठ नागरिकांना साहाय्य करावे, असेही न्यायालयाने आदेश दिले. 

पुण्यात राहणाऱ्या निवृत्त आई - वडिलांच्या विरोधात त्यांच्या मुलांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. उत्पन्नाचे स्रोत असतानाही राहते घर मुलांच्या नावावर करण्याची मागणी मुलगा आणि सुनेने आई-वडिलांकडे केली होती. यासाठी त्यांचा शारीरिक व मानसिक छळही दोघे करीत होते. याविरोधात वडिलांनी निगडी पोलिस ठाण्यामध्ये दोन्ही मुले आणि सुनांविरोधात तक्रार दाखल केली होती. स्थानिक न्यायालयाने मुलांना घरातून बाहेर जाण्याचे आदेश दिले होते. मात्र, तरीही दोघे वडिलांच्या घरात राहून त्यांचा छळ करीत होते. त्याशिवाय संबंधित जागेमध्ये वारसा हक्काने वाटा मिळावा, अशी मागणी मुलांनी न्यायालयात केली होती. मात्र, राहते घर वडिलोपार्जित नसून, आई-वडिलांनी स्वतःच्या कष्टाने बांधलेले आहे, त्यामुळे त्यावर मुलांचा अधिकार राहात नाही, असे न्या. साधना जाधव यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर अशाप्रकारे वृद्ध आई-वडिलांची होणारी छळवणूक टाळण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कायद्याची चोख अंमलबजावणी राज्य सरकारने करावी आणि त्यासाठी प्रसिद्धिमाध्यमे, जाहिरातींमार्फत जनजागृती करावी, असे आदेशही खंडपीठाने दिले आहेत.

Web Title: maharashtra news court senior citizens