अत्याचाराविरोधात 22 प्रकारचे पुरावे गोळा करता येणार 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 21 जुलै 2017

मुंबई - बलात्कार पीडितावर उपचार करण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद कसा साधावा आणि न्यायवैद्यक पुरावे गोळा कसे करावेत याचे प्रशिक्षण डॉक्‍टरांना दिले जाणार आहे. त्यामुळे बलात्कारित गुन्हेगारांच्या विरोधातील भक्‍कम पुरावे शोधण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. बलात्कार पीडितेची योग्य तपासणी केल्यास 22 प्रकारचे पुरावे डॉक्‍टर गोळा करू शकणार आहेत. 

मुंबई - बलात्कार पीडितावर उपचार करण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद कसा साधावा आणि न्यायवैद्यक पुरावे गोळा कसे करावेत याचे प्रशिक्षण डॉक्‍टरांना दिले जाणार आहे. त्यामुळे बलात्कारित गुन्हेगारांच्या विरोधातील भक्‍कम पुरावे शोधण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. बलात्कार पीडितेची योग्य तपासणी केल्यास 22 प्रकारचे पुरावे डॉक्‍टर गोळा करू शकणार आहेत. 

बलात्कार पीडितांची न्याय वैद्यक चाचणी योग्य प्रकारे व्हावी यासाठी एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या न्यायवैद्यक शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात बलात्कार पीडितांच्या न्यायवैद्यक चाचणीचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे बलात्कार पीडितांची न्यायवैद्यक चाचणी कशी करावी, हे आता एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांना पदवीचे शिक्षण घेतानाच शिकवले जाणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने बलात्कार पीडितांच्या न्यायवैद्यक तपासणीसाठी नवीन नियमावली व अहवाल मध्ये व त्यानंतर केंद्र सरकारने मध्ये संपूर्ण देशासाठी नवीन नियमावली तयार केली होती. त्यानुसार, सर्व डॉक्‍टरांना नवीन नियमावलीनुसारच वैद्यकीय तपासणी करणे बंधनकारक केले होते. एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यानंतर बलात्कार पीडितांची न्यायवैद्यक तपासणी करण्यासाठी जुन्या अहवालानुसारच प्रशिक्षण दिले जात होते. नवीन नियमावलीचा पाठपुरावा करणारे वर्धा येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे क्‍लिनिकल फॉरेन्सिक केंद्राचे प्रमुख डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी सांगितले, की पीडितेची वैद्यकीय तपासणी कशी करावी, याबाबतच्या जुन्या नियमावलीत अनेक त्रुटी होत्या. नवीन नियमावली तयार झाली होती. मात्र तिचा समावेश अद्याप अभ्यासक्रमात करण्यात आलेला नव्हता. नवीन नियमावली तयार झाल्याने बलात्कार पीडितेला पोलिसांशिवाय दवाखान्यात येता येईल. पोलिस येण्यापूर्वी तिच्यावर उपचारदेखील करता येणार आहेत. डीएनए तपासणीची मागणी पोलिसांनी करण्यापूर्वी ती करता येणार आहे. तसेच पीडितेला तिची तपासणी कशी होणार हे समजावून सांगावे लागून तिच्या परवानगीनेच ती करता येणार आहे. नवीन नियमावलीमध्ये पीडितेला आधार, विश्‍वास देण्याबरोबरच तिचा सन्मानही ही डॉक्‍टरांकडून राखला जावा, यासाठी मार्गदर्शन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

डॉ. खांडेकरांच्या पाहणी अहवालाचा आधार 
एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाच्या न्यायवैद्यक शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमात याचा समावेश करण्यात आल्याची माहिती नाशिकमधील आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिली. डॉ. इंद्रजित खांडेकर यांनी 2010 मध्ये केलेल्या पाहणी अहवालातून बलात्कार पीडितांच्या न्यायवैद्यक तपासणीची चेष्टा व त्यामुळे होणारी न्यायदानाची गफलत अधोरेखित केली होती, तसेच अशा तपासणीसाठी योग्य नियमावली, तसेच डॉक्‍टरांना योग्य प्रशिक्षण नसणे हे चुका होण्याचे एक मुख्य कारण आहे, असे नमूद केले होते. बलात्कार पीडितांची न्यायवैद्यक चाचणी कशी करावी, हे आता एमबीबीएसची पदवी घेतानाच शिकविले गेल्याने आरोपी पकडण्यासाठी किंवा आरोप सिद्ध होण्यासाठी बरीच मदत होणार आहे. बलात्कार पीडितेची योग्य तपासणी केल्यास 22 प्रकारचे पुरावे डॉक्‍टर गोळा करू शकतात, असा दावा डॉ. इंद्रजित यांनी केला. 

Web Title: maharashtra news crime