क्रूझ टर्मिनलमुळे जीडीपीवाढीतही योगदान राहील

क्रूझ टर्मिनलमुळे जीडीपीवाढीतही योगदान राहील

मुंबई  - केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित सहभागातून मुंबईत आकाश, पाताळ, जल आणि स्थळ अशा सर्वच ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे होत आहेत. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबईच्या पूर्व समुद्री किनाऱ्याचा मोठा कायापालट होत आहे. पूर्वी फक्त खास लोकांसाठी खुला असलेला मुंबई पोर्ट ट्रस्टचा भाग आता सामान्य लोकांसाठी खुला होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल, कोस्टल रोड, सी प्लेन, रोरो सेवा, प्लोटिंग रेस्टॉरंट अशा विविध प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राकडे देश विदेशातील पर्यटक आकर्षित होण्याबरोबरच राज्याच्या जीडीपीवाढीमध्ये मोठे योगदान मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे नवीन आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलचे आज फडणवीस व केंद्रीय जहाज आणि रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्या वेळी ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, "मुंबईतील रोरो टर्मिनलचे काम 25 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येईल. साधारण एप्रिलपासून ही सेवा सुरू करण्यात येईल. मांडवा, नेरुळ येथे रोरो सेवेच्या माध्यमातून वाहने गेल्यास वेळ आणि इंधनाची बचत होण्याबरोबरच रस्त्यांवरील गर्दी कमी होऊ शकेल. जेएनपीटी येथे सेझच्या माध्यमातून मोठी गुंतवणूक येत आहे. महाराष्ट्राच्या जीडीपीवाढीसाठी याचा फार मोठा लाभ होईल.'' नितीन गडकरी म्हणाले, की सागरमाला प्रकल्पांतर्गत महाराष्ट्राला मोठा लाभ मिळत आहे. या प्रकल्पांतर्गत 2.41 लाख कोटींच्या 86 प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे. क्रूझ पर्यटनाला मुंबईत मोठा वाव आहे. सध्या मुंबईत दरवर्षी फक्त 80 क्रूझ येतात. त्यातून फक्त 2 लाख पर्यटक येतात. भविष्यात ही संख्या वार्षिक साधारण 950 क्रूझ आणि 40 लाख पर्यटकांपर्यंत वाढविण्याचे ध्येय आहे. त्यासाठीच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रूझ टर्मिनलचे काम आम्ही हाती घेतले आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करून महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले जाईल, असे गडकरी म्हणाले. 

क्रूझ टर्मिनलची वैशिष्ट्ये 
नवीन आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलची अंदाजित किंमत सुमारे 300 कोटी रुपये इतकी असून, त्याचे क्षेत्रफळ हे साधारण 4.15 लाख वर्गफूट इतके असेल. वर्षातल्या सर्व दिवशी ते कार्यान्वित असेल. जून 2019 पर्यंत याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील 80 टक्के क्रूझ प्रवाशांची या टर्मिनलमधून ने-आण करण्यात येईल. तळमजला अधिक तीन मजले असे या टर्मिनलचे स्वरूप असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com