डी. एस. कुलकर्णींना  गुरुवारपर्यंत दिलासा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

मुंबई - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना गुरुवारपर्यंत अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

मुंबई - बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना पुन्हा एकदा मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. त्यांना गुरुवारपर्यंत अटक करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 50 कोटी रुपये जमा करण्याची अट कुलकर्णी येत्या तीन दिवसांत पूर्ण करतील, असेही त्यांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. डी. एस. कुलकर्णी यांच्या सुमारे 200 कोटी रुपयांच्या गुंतवणूक योजनेमध्ये फसवणूक झालेल्या शेकडो नागरिकांनी मुंबई, पुण्यात त्यांच्याविरोधात फौजदारी फिर्यादी केल्या आहेत. त्यामुळे कुलकर्णी पती-पत्नींनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. न्यायालयाने त्यांना 50 कोटी रुपये न्यायालयात जमा करण्याचे आदेश यापूर्वी दिले आहेत. ही रक्कम जमा करण्यासाठी कुलकर्णी यांनी अनेक दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र, त्यांच्या अनेक मालमत्ता बॅंकांनी सील केल्यामुळे आणि अंमलबजावणी संचालनालयाने खाती गोठविल्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर एका परदेशी कंपनीकडून सुमारे 80 लाख (प्रत्येकी 40-40 लाख) अमेरिकन डॉलर त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचे दोन व्यवहार सध्या अंतिम टप्प्यात आले आहेत. याबाबतची कागदपत्रे आज न्यायालयात दाखल करण्यात आली. येत्या तीन दिवसांमध्ये ही रक्कम खात्यामध्ये जमा होऊ शकेल, असा दावा कुलकर्णी यांच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे न्या. साधना जाधव यांनी येत्या गुरुवारपर्यंत कुलकर्णी यांना अटक न करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. या व्यवहारावर तपास यंत्रणेला देखरेख ठेवण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. जामीन अर्जावरील सुनावणी 25 जानेवारीला होणार आहे. पुणे पोलिस आणि अंमलबजावणी संचालनालयाकडे कुलकर्णी यांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत. 

Web Title: maharashtra news D S kulkarni high court