राज्यात लवकरच आरोग्य उपकर 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई आरोग्याची  राजधानी व्हावी 
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार या वेळी म्हणाले, की महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आरोग्य राजधानी करण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. डॉक्‍टरांच्या संख्येत वाढ होण्याची आवश्‍यकता असून, त्याद्वारे वैद्यकीय यंत्रणा सक्षम होऊ शकेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

मुंबई - राज्यात लवकरच आरोग्य उपकर आकारण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली. आरोग्य यंत्रणेत सुधारणा आणि प्रत्येकाचा आरोग्य विमा असावा याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे, असेही ते म्हणाले. 

येथील "हेल्थकेअर कॉन्क्‍लेव्ह 2017' च्या व्यासपीठावरून आरोग्यमंत्री बोलत होते. ते म्हणाले, की राष्ट्रीय आरोग्य धोरणात आरोग्य विमावर भर देण्यात आला आहे. यावर आधारित पूरक विमा योजना तयार करण्यात येत आहे. प्रत्येकाला विमा कवच मिळेल, याकरिता प्रभावी अंमलबजावणी आवश्‍यक आहे. यासाठी कुठेही पैसा कमी पडू नये म्हणून आरोग्य उपकर आकारण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेचे भविष्य डिजिटल माध्यमात आहे. खेडोपाडी ही यंत्रणा गरजेची आहे. टेलिमेडिसिन हा त्यातलाच एक महत्त्वाचा भाग आहे. यात मोबाईल किंवा इंटरनेटशिवायही लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळू शकतील. 

या वेळी डॉ. सावंत यांनी रिअल टाइम मेडिसिन या संकल्पनेवर भर दिला. यात आधुनिक सुधारणा करण्यासाठी लागणारा पैसा आरोग्य उपकरातून मिळेल, असा विश्‍वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. राज्य सरकारतर्फे राबविण्यात येणाऱ्या राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत 2 कोटी 43 लाख कुटुंबांना विमा संरक्षण मिळते, असेही ते म्हणाले. 

या वेळी डिजिटल हेल्थ ट्रान्स्फॉर्मिंग हेल्थकेअर या अहवालाचे आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या कार्यक्रमात दिवसभरात विमा आणि आरोग्य, प्राथमिक आरोग्य यंत्रणा, आरोग्य यंत्रणेतील डिजिटल यंत्रणेचा समावेश आदी विषयांवर चर्चासत्रे झाली. 

Web Title: maharashtra news deepak sawant