कर्जमाफीनंतर आता कर्जमुक्तीचा निर्धार - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

मुंबई - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतीतील गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्धार केला असून, शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे सांगितले.

मुंबई - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शेतीतील गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्त करण्याचा निर्धार केला असून, शेतकऱ्यांचे प्रश्न चर्चेद्वारे सोडविण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे सांगितले.

शेतकऱ्यांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देण्याचा अभूतपूर्व निर्णय सरकारने घेतल्याबद्दल पुणतांब्यासह परिसरातील ४० गावातील शेतकरी मुख्यमंत्र्यांचे आभार मानण्यासाठी येथे आले होते. सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कामगारमंत्री संभाजी पाटील- निलंगेकर उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील व  निलंगेकर यांचा सत्कार शेतकऱ्यांनी केला.

फडणवीस या वेळी म्हणाले की, राज्यातच नव्हे तर देशात सर्वाधिक अशी राज्यातील ८९ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे. राज्याने गेली दोन ते तीन वर्ष सलग प्रचंड दुष्काळाचा सामना केला आहे. ‘आभाळच फाटलंय’ त्यातून खचून न जाता ते शिवण्याचे काम राज्य सरकारने सुरू केले आहे. त्यासाठी सर्वांची साथ आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकार तयार आहे.

शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी शेती क्षेत्रामध्ये अधिकाधिक गुंतवणूक वाढवून शेतकरी कर्जमुक्तीचा निर्धार केला आहे. शेतकरी कर्जमुक्त झाल्यावर मी खऱ्या अर्थाने समाधानी होईल. सरकारमार्फत शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेकविध उपाययोजना करण्यात येत आहेत. कृषी पंपांना सौरऊर्जा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे. दोन दुष्काळांचा सामना करू शकेल एवढे पाणी या माध्यमातून मिळाले आहे, असे फडणवीस म्हणाले.

Web Title: maharashtra news devendra fadnavis farmer loan