सूर्यांकुरांना शिक्षणास्त्र बहाल करणारी दीक्षाभूमी 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण झाले. महापरिनिर्वाण झाले असले तरी त्यांचे विचार सर्वत्र पोहोचविण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला. विविध संस्थांमार्फत बाबासाहेबांचे विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचविल्या जाते. अशा काही संस्थांच्या कार्याविषयी थोडक्‍यात माहिती... 

नागपूर - सहा डिसेंबर हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. बाबासाहेबांची महापरिनिर्वाण यात्रा अंत्यसंस्कारासाठी मुंबईत राजगृहातून दादरच्या भागेश्‍वर स्मशानभूमीत पोहोचली. समुद्रकिनाऱ्यावर चंदनाच्या चितेवर बाबासाहेबांचे शव चढवले. आणि ती चैत्यभूमी बनली. या चैत्यभूमीत बाबासाहेबांच्या चितेला साक्षी ठेवून दोन लाख शोकाकुल समाजाने बौद्ध समाजाची दीक्षा घेतली होती. भदन्त आनंद कौशल्यायन यांनी या वेळी 22 प्रतिज्ञांसह बुद्धवंदना, पंचशील देऊन दीक्षा दिली होती, तर नागपुरातील बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीतून प्रेरणाभूमी ठरलेल्या दीक्षाभूमीत भव्य स्मारक उभारण्यात आले. 

राजकीय, सामाजिक, वैचारिक, आर्थिक, शैक्षणिक परिवर्तनाचे केंद्र दीक्षाभूमीत उभारले. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणातून बाबासाहेब नावाचा सूर्य अस्ताला गेला असला तरी आंबेडकरवाद्यांसाठी ही शिक्षणाच्या क्रांतीची प्रयोगशाळा ठरली. या दीक्षाभूमीत उभारलेल्या शैक्षणिक संस्थेतून लाखो सूर्यांकुर घडू लागले आहेत. दीक्षाभूमी हीच आंबेडरवादी सूर्यांकुरांच्या मुक्तीची प्रयोगशाळा बनली आहे. बाबासाहेबांच्या सांगण्याप्रमाणे दीक्षाभूमीत शिक्षण देणारी संस्था स्मारक समितीने उभारली. राज्यात नॅकने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाला "अ' दर्जा दिला. शेकडो मुलं बारावीत गुणवत्ता यादीत येतात. कला वाणिज्य आणि विज्ञान शाखेसह पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांची संख्या दहा ते बारा हजारांच्या वर आहे. देदीप्यमान देशभक्ताचे, स्फूर्तिस्थानाचे, उद्धारकर्त्याचे, मुक्तीदात्याला भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यासाठी हजारो कार्यकर्ते एकाचवेळी दीक्षाभूमीवर येतात. 

""डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीचे ठिकाण आहे. येथे शैक्षणिक संस्थेचे रोपटे 1969 साली लावले. आता हा वृक्ष झाला आहे. बाबासाहेब म्हणाले होते, जो वाघिणीचे दूध प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तेच शिक्षण येथे दिले जाते. बाबासाहेबांचा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करण्याची प्रेरणा दीक्षाभूमीतून मिळते''.  
-सदानंद फुलझेले, कार्यवाह, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, नागपूर. 

बासाहेबांच्या परीसस्पर्शाने पुनीत झालेल नागसेनवन परिसर 
औरंगाबाद ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये 19 जून 1950 रोजी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे मिलिंद महाविद्यालय सुरू केले. नागसेन वन परिसरात महाविद्यालयाची इमारत उभी करण्यापूर्वी कॅन्टॉन्मेंट परिसरात पाच बंगले किरायाने घेऊन तिथे वर्ग भरविण्यास सुरुवात केली होती. 1955 मध्ये मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीचे काम सुरू झाले त्यावेळी बाबासाहेब स्वत: लक्ष ठेवत. कॅन्टॉन्मेंटमधील बंगल्यांपैकी एका बंगल्यात ते राहत. नागसेनवन परिसरातील नालंदा वसतिगृह त्यांच्या हयातीतच उभारले त्यावेळी ते खुर्ची टाकून बसत. याच वसतिगृहात आता मिलिंद कला व विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थी राहतात. मिलिंद महाविद्यालयात बाबासाहेबांच्या वापरातील वस्तू जतन करून ठेवल्या आहेत. यामध्ये त्यांचा लाकडी पलंग, गादी, बेडशीट, टॉवेल्स, त्यांची खुर्ची, टेबल, काठ्या, चहाची, नाश्‍त्यासाठी वापरत असलेली भांडी, शिल्पकार मडीलगेकर यांच्याकडून तयार करून घेतलेल्या बुद्धमूर्ती मिलिंद महाविद्यालयाच्या वरच्या मजल्यावर जीवापाड जपून ठेवलेल्या आहेत. तसेच ग्रंथालयामध्ये बाबासाहेबांचे ग्रंथ स्वतंत्रपणे जतन करून ठेवले आहेत. 

संशोधन केंद्र 
औरंगाबाद शहरातील ऐतिहासिक आमखास मैदानावरही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा झाल्याचे सांगितले जाते. या आमखास मैदानाजवळच महापालिकेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र बांधले आहे. या संशोधन केंद्रातही बाबासाहेबांच्या दुर्मीळ तसबिरी, त्यांच्या स्वक्षऱ्यांचे अनेक नमुने, त्यांच्या वापरातील काही वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. अनेक अभ्यासक, संशोधक या संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी आल्यानंतर बाबासाहेबांच्या वस्तू, त्यांची छायाचित्रे, त्यांच्या स्वाक्षऱ्या आवर्जुन पाहतात. 

बाबासाहेबांच्या विचारांची प्रसार करणारी संस्था  
सोलापूर ः आंबेडकरी चळवळीत सक्रिय सेवानिवृत्त आणि सध्या कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन सोलापुरात डॉ. आंबेडकर सेंटर फॉर सोशल स्टडीज संस्था स्थापन केली. आंबेडकरी विचारधारा युवकांपर्यंत पोहोचविणे आणि त्यामार्फत प्रसार करणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून 14 एप्रिल 2006 रोजी डॉ. आंबेडकर सेंटर फॉर सोशल स्टडीज ही संस्था उदयास आली. संस्थेच्या माध्यमातून गेली अकरा वर्षे आंबेडकरी विचारधारा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम संस्थेमार्फत केले जात आहे. सध्य राजकीय आणि सामाजिक स्थितीत जे प्रश्‍न निर्माण होत आहेत, त्यावर बाबासाहेबांनी काय विचार मांडले होते त्याबाबत मार्गदर्शन करणे, त्यासाठी परिसंवाद आणि उपक्रमांचे आयोजन करून त्यामध्ये तरुणांना वाव देणे हा ही संस्था उभारण्यामागचा मुख्य उद्देश आहे. संस्थेमार्फत आतापर्यंत ज्वलंत विषयांवर परिसंवाद आयोजित केले होते. प्रामुख्याने ऍट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील परिसंवादामुळे या कायद्याची व्याप्ती आणि त्याची सद्यस्थिती याची माहिती मिळण्यास मदत झाली. संविधान दिनानिमित्त कायदेतज्ज्ञांचा परिसंवाद, भारतीय राज्यघटनेचे महत्त्व किती आहे, महिलांचे आरक्षण या विषयांवरही तज्ज्ञांच्या उपस्थितीत चर्चासत्रे भरविण्यात आली. 26 व 27 नोव्हेंबर 1927 या दोन दिवशी डॉ. आंबेडकर यांच्या उपस्थितीत सोलापुरात महार वतन परिषद झाली होती. त्याला यंदा 90 वर्षे पूर्ण झाली. त्याचे औचित्य साधून त्या परिषदेत बाबासाहेबांनी केलेल्या आर्थिक प्रश्‍नावर आधारित भाषणावर परिसंवाद घेतला. 

होतकरू दोन विद्यार्थ्यास परदेशी शिक्षणासाठी येणारा खर्चही संस्थेमार्फत केला जातो. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांच्यासह प्राचार्य उत्तमराव क्षीरसागर, अंबादास कदम, सर्वोत्तम रणशूर, सारंगपाणी रणदिवे, सुधीर चंदनशिवे, सुनील आवारे, अंगद जेटीथोर, विद्याधर सातपुते, सुधीर कांबळे, सुजीत हावळे, सुनीता गायकवाड, सुचित्रा थोरे, पद्मजा सर्वगोड, शीला हावळे, वनिता चंदनशिवे, जयश्री रणदिवे, प्रा. अंजना गायकवाड हे संस्थेवर कार्यरत आहेत. 

बाबासाहेबांच्या प्रेरणेचे ज्ञानदानाला अधिष्ठान 
नाशिक ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान विकास केंद्राने गेल्या 50 वर्षांत नाशिक शहरातील दलित, आदिवासी आणि गरीब कुटुंबातील मुलामुलींना ज्ञानाचे कवाडे खुली केलीत. कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड आणि ज्येष्ठ समाजसेविका डॉ. शांताबाई दाणी यांच्या पुढाकारातून नाशिकमध्ये शिक्षण संस्थेची स्थापना झाली. कुणाल प्राथमिक शाळा, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, नाशिक रोडचे तक्षशीला विद्यालयाच्या माध्यमातून पाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. गौतम छात्रालयाच्या माध्यमातून वसतिगृह कार्यरत आहे. सद्यस्थितीत बारावीपर्यंत शिक्षण दिले जात असून भविष्यात महाविद्यालयीन आणि तंत्रशिक्षण उपलब्ध करण्याचा मानस संस्थेचे अध्यक्ष करुणासागर पगारे यांनी व्यक्त केलाय. संस्थेने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती चैतन्य स्तूपाच्या माध्यमातून जोपासल्या आहेत. त्यात डॉ. आंबेडकर यांच्या अस्थी आहेत. तसेच डॉ. आंबेडकर यांचा सूट, बुट, काठी, हॅट जपून ठेवली आहे. जिल्ह्यात बाबासाहेबांच्या साहित्याचे जतन करणारी ही एकमेव संस्था आहे. संस्थेतर्फे शिक्षण संकुलात नवी इमारत उभारण्यात येत आहे. कोणत्याही विद्यार्थ्याकडून शुल्क न आकारता शिक्षणाचे धडे गिरवले जातात. 

Web Title: Maharashtra news Dr. babasaheb ambedkar Mahaparinirvan Din deekshabhoomi