तंबाखूमुक्तीसाठी विशेष मोहीम राबवा - डॉ. रणजित पाटील

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 25 जानेवारी 2018

- 6 फेब्रुवारीपासून विशेष मोहीम 
-अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर समन्वय समिती 
- महिन्याला अंमलबजावणीचा आढावा 
- टोल फ्री क्रमांक सुरू करणार 

मुंबई - सर्व शाळा, महाविद्यालये तंबाखूजन्य पदार्थ, गुटखामुक्त करण्यासाठी पोलिस, अन्न व औषध प्रशासन आदी सर्व शासकीय यंत्रणांनी विशेष मोहीम राबवावी; तसेच या मोहिमेत स्वयंसेवी संस्थांबरोबरच नागरिकांचा सहभाग घ्यावा, असे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज दिले. 

सिगारेट्‌स आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने (जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण यांचे नियमन) अधिनियम, 2003 (कोट्‌पा)बाबत आढावा बैठक डॉ. पाटील यांच्या दालनात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. धूम्रपान तसेच गुटखा, तंबाखूचे सेवन करणाऱ्यांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असल्याचे सांगून डॉ. पाटील म्हणाले, शालेय जीवनापासूनच व्यसनांच्या दुष्परिणामाबाबत प्रबोधन झाल्यास विद्यार्थ्यांमधील व्यसनांचे प्रमाण रोखणे शक्‍य होईल. शाळा, महाविद्यालयांच्या 100 यार्डच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस कोट्‌पा अधिनियमानुसार बंदी आहे. या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्‍यक आहे. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांचा परिसर तंबाखूजन्य पदार्थ, गुटखामुक्त करण्यासाठी येत्या जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने 6 फेब्रुवारीपासून राज्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यस्तरापासून ते जिल्हास्तरावर पोलिस, अन्न व औषध प्रशासन, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था यांचा समन्वय करण्यात येणार असून, स्वयंसेवी संस्थांचाही सहभाग घेण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, सिगारेट्‌स आदी तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यास त्याची माहिती देण्यासाठी एक विशेष टोल फ्री क्रमांक सुरू करावा. राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांचा परिसर तंबाखूमुक्त करावयाचा आहे. मोहिमेच्या प्रसिद्धीसाठी प्रसिद्धिमाध्यमांनीही महत्त्वपूर्ण भूमिका बजावावी, असे आवाहनही डॉ. पाटील यांनी केले. 

Web Title: maharashtra news dr rajnjeet patil Special campaign for tobacco empowerment