बळिराजाची दिवाळी गोड 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

मुंबई  - दिवाळीच्या मुहूर्तावर बळिराजाची कर्जमाफी प्रत्यक्षात येणार आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या आठ ते दहा लाख शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या (ता. 17) धनत्रयोदशीला सायंकाळी जाहीर केली जाणार असून 18 सप्टेंबरला (बुधवार) शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी 89 लाख शेतकऱ्यांचा अंदाज व्यक्‍त केला असला, तरी प्रत्यक्षात अर्ज 56 लाख शेतकऱ्यांचेच आले असून, सरकारने जाहीर केलेल्या काटेकोर निकषांमधून पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 25 लाखांपेक्षा अधिक असणार नाही.

मुंबई  - दिवाळीच्या मुहूर्तावर बळिराजाची कर्जमाफी प्रत्यक्षात येणार आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या आठ ते दहा लाख शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या (ता. 17) धनत्रयोदशीला सायंकाळी जाहीर केली जाणार असून 18 सप्टेंबरला (बुधवार) शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी 89 लाख शेतकऱ्यांचा अंदाज व्यक्‍त केला असला, तरी प्रत्यक्षात अर्ज 56 लाख शेतकऱ्यांचेच आले असून, सरकारने जाहीर केलेल्या काटेकोर निकषांमधून पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 25 लाखांपेक्षा अधिक असणार नाही. त्यामुळे 34 हजार कोटींची ही योजना जेमतेम 10 ते 12 हजार कोटींमध्येच गुंडाळली जाणार असल्याचा अंदाज सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. 

कर्जमाफीसाठी अर्ज केलेल्या 56 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ आठ ते दहा लाख शेतकऱ्यांनाच पहिल्या टप्प्यात त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत निमंत्रित शेतकऱ्यांना, तर पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रत्येक जिल्ह्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी मंजुरीचे पत्र देण्यात येणार आहे. 

उद्या आठ ते दहा लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर होण्याबरोबरच प्रलंबित अर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांची पिवळ्या आणि फेटाळण्यात आलेल्या अर्जांची लाल यादीही जाहीर करण्यात येणार आहे. पिवळ्या यादीतील शेतकऱ्यांच्या अर्जावर अद्याप पूर्ण कार्यवाही झालेली नाही. त्यापैकी काही अर्ज अपूर्ण किंवा त्यांच्या इतर तपशिलांविषयीची माहितीची पडताळणी सुरू असल्याने यादीतील शेतकऱ्यांचे अर्ज प्रलंबित आहेत, तर लाल यादीतील अर्जदारांचे अर्ज फेटाळण्यात आले असल्याची माहिती माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. उद्या जाहीर होणाऱ्या पहिल्या यादीबरोबर पिवळी आणि लाल यादीही प्रसिद्ध केली जाण्याचा सहकार विभागाचा प्रयत्न असून, त्यावर शेवटच्या टप्प्यात काम सुरू आहे. 

शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व संपानंतर 28 जूनला फडणवीस यांनी "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017' जाहीर केली. शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंतचे कर्ज देताना जमीन धारण मर्यादा काढून टाकण्यात आली होती हे योजनेचे मुख्य वैशिष्ट्य होते. योजना जाहीर झाल्यानंतरही त्यातील अटींमधील त्रुटी कमी करण्याचा लवचिकपणा ठेवत सरकारने शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींबरोबरच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशीही याविषयी चर्चा केली होती. त्यानंतर जवळपास 112 दिवसांनंतर या कर्जमाफीचा पहिला टप्पा प्रत्यक्षात येतो आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरणे, आधारकार्ड असणे सक्‍तीचे करण्यात आले होते. कर्जमाफी योजनेत पारदर्शीपणा राहावा यासाठी यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यावर भर देण्यात आला होता. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू असून, येत्या 18 ऑक्‍टोबरपासून कर्जमाफीचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

कर्जमाफीसाठी कमी रक्कम लागणार 
89 लाख शेतकऱ्यांसाठी 34 हजार कोटींची "छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017' योजनेची घोषणा फडणवीस यांनी 28 जूनला जाहीर केली होती. जवळपास 112 दिवसानंतर ही योजना प्रत्यक्षात साकारली जात असल्याचा सोहळा सत्तेत असलेले भाजपचे सरकार साजरा करणार आहे. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी 89 लाख शेतकऱ्यांचा अंदाज व्यक्‍त केला असला तरी प्रत्यक्षात अर्ज 56 लाख शेतकऱ्यांचेच आले असून सरकारने जाहीर केलेल्या काटेकोर निकषांमधून पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 25 लाखांपेक्षा अधिक असणार नाही. त्यामुळे 34 हजार कोटींची ही योजना जेमतेम 10 ते 12 हजार कोटींमध्येच बसेल, असा अंदाज सहकार विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Web Title: maharashtra news farmer diwali