ऑनलाइन अर्जासाठी 15 सप्टेंबरपर्यंत मुदत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवण्यात येणार असल्याच्या घोषणेवरून राज्य सरकारने पुन्हा एकदा "यू टर्न' घेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 15 सप्टेंबर ही अखेरची मुदत राहील, असा निर्णय घेतला आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने मंगळवारी ही घोषणा केली. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मुंबई - शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत केंद्रे सुरू ठेवण्यात येणार असल्याच्या घोषणेवरून राज्य सरकारने पुन्हा एकदा "यू टर्न' घेत ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी 15 सप्टेंबर ही अखेरची मुदत राहील, असा निर्णय घेतला आहे. शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने मंगळवारी ही घोषणा केली. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले आहे. दीड लाखापुढील शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड योजनेचा लाभ दिला जाणार आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांसाठी 25 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. तसेच या योजनेत कर्ज पुर्नगठीत झालेल्या शेतकऱ्यांनाही लाभ दिला जाणार आहे. या कर्जमाफीचे लाभ देण्यासाठी शेतकऱ्यांची माहिती ऑनलाइन अर्जाद्वारे घेतली जात आहे. 

ऑनलाइन अर्ज भरून घेण्यासाठी 26 हजार केंद्रांवर सुविधा उपलब्ध आहेत. आपले सरकार सेवा केंद्र, नागरिक सुविधा केंद्र, संग्राम आणि काही ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचा समावेश आहे. 

कर्जमाफीचे हे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती; मात्र अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना फारच कमी कालावधी राहिला असल्यामुळे या मुदतीत उर्वरित शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरणे अशक्‍य होते. यासंदर्भात राज्य सरकारने सर्व लाभार्थी शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होईपर्यंत ग्रामीण भागातील केंद्रे सुरू ठेवणार असल्याची घोषणा केली होती. 

दरम्यान, शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने राज्य सरकारने नेमलेल्या मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आज बैठक झाली. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात ही बैठक झाली. या बैठकीला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहनमंत्री दिवाकर रावते, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सहकार खात्याचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, कृषीचे प्रधान सचिव विजयकुमार आदी उपस्थित होते. या वेळी या समितीने ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याचा नवीन निर्णय घेतला. तसेच शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. 

राज्यात काही ठिकाणी ई सेवा केंद्रांमध्ये विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अनेक केंद्रे बंद अवस्थेत आहेत. विशेषतः इंटरनेटचा वेग आणि इतर बाबी अडचणीच्या ठरत आहेत. त्यावर मात करण्यासाठी राज्याच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाला समितीने निर्देश दिले आहेत. दोष दुरुस्त करून लवकरात लवकर राज्यातील सर्व ई सेवा केंद्रे सुरू होतील, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. 

राज्य सरकारच्या दाव्यानुसार राज्यात 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 21 ऑगस्टअखेर 21 लाख 57 हजार 344 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून, 17 लाख 95 हजार 104 शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून झाले आहेत. राज्यात सध्या एकेका दिवसात एक ते सव्वा लाख शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून होत आहेत. उर्वरित सुमारे 71 लाख शेतकऱ्यांना येत्या 15 सप्टेंबरपूर्वी अर्ज भरावे लागणार आहेत. शेतकऱ्यांची संख्या आणि अर्ज भरण्याची अंतिम मुदत पाहता अर्ज भरण्यासाठी आणखी मुदतवाढ द्यावी लागणार असल्याचे मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Web Title: maharashtra news farmer loan