शेतकरी कर्जमाफीसाठी आतापर्यंत 71 लाख अर्ज 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंतिम मुदत चार दिवसांवर आली आहे. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. आज दुपारपर्यंत राज्यभरातील 71 लाख 40 हजार 920 शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. 

मुंबई - राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीची अंतिम मुदत चार दिवसांवर आली आहे. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. आज दुपारपर्यंत राज्यभरातील 71 लाख 40 हजार 920 शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे. सुमारे 89 लाख जणांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असा दावा सरकारने केला आहे. दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. कर्ज पुनर्गठीत झालेल्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचे लाभ मिळणार आहेत. तसेच नियमित परतफेड करणाऱ्यांनाही 25 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन दिले जाणार आहे. 

यासाठी थकबाकीदार शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात येत आहेत. 24 जुलैपासून अर्ज भरून घेण्याची ही प्रक्रिया सुरू आहे. गेल्या 47 दिवसांत 85 लाख दोन हजार 812 शेतकऱ्यांनी त्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यापैकी 71 लाख 40 हजार 920 इतके अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. येत्या 15 सप्टेंबरपर्यंत कर्जमाफीचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. त्यामुळे कामकाजाच्या या चार दिवसांत उर्वरित शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरून घेण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. राज्यभरातील महा-ई-सेवा, नागरी सुविधा केंद्रे, जिल्हा बॅंका आणि काही ठिकाणी विविध कार्यकारी विकास सोसायट्यांमध्येही हे अर्ज भरून घेतले जात आहेत. हे ऑनलाइन अर्ज भरून घेताना काही ठिकाणी अडचणी येत आहेत. मात्र, त्यावर मात करीत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल असा दावा सहकार खात्यातील उच्चपदस्थांकडून केला जात आहे. 

Web Title: maharashtra news farmer loan