बळिराजाला सरकारची दिवाळी भेट! 

बळिराजाला सरकारची दिवाळी भेट! 

मुंबई - कर्जमाफीच्या निकषात बसणारा शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरूच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. 18) येथे दिली. योजनेच्या अंमलबजाणीच्या पहिल्या टप्प्याला बुधवारपासून सुरुवात झाली. साडेआठ लाख खातेदार शेतकऱ्यांच्या खात्यात चार हजार कोटी जमा करण्यात आले आहेत. त्यात कर्जमाफीसाठीचे चार लाख 62 हजार खातेदार असून प्रोत्साहनपर रक्कम योजनेचे तीन लाख 78 हजार खातेदार आहेत. पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी 3200 कोटी; तर प्रोत्साहनपर रक्कम योजनेसाठी 800 कोटी बुधवारी जमा करण्यात आले. 15 नोव्हेंबरपर्यंत 75 टक्के काम पूर्ण करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

सह्याद्री अतिथिगृह येथे कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वितरणाचा राज्यस्तरीय सोहळा झाला, त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, परिवहन मंत्री दिवाकर रावते, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार मंत्री सुभाष देशमुख, मुख्य सचिव सुमित मल्लिक आदी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आठ विभागांतील कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. राज्यस्तरीय सोहळ्यासह प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते शेतकऱ्यांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. 

मुख्यमंत्री म्हणाले, की आजचा दिवस महत्त्वाचा आणि कर्तव्यपूर्तीचा आहे. बळिराजावरील संकट दूर करण्यासाठी कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. नैसर्गिक संकटामुळे शेतीचा विकास दर उणे होता, उत्पादन घटले होते. यावर मात करण्यासाठी सुरुवातीची दोन वर्षे आम्ही शेतीत तीन पटीने गुंतवणूक वाढवली. त्यामुळे आज ज्या भागात काही उगवत नव्हते, तेथे फळबागा फुलल्या आहेत. आता शेतीचा विकास दर 12.5 टक्‍क्‍यांवर गेला असून त्याचे उत्पादन 40 हजार कोटींनी वाढले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

कर्जमाफीची रक्कम मुख्य खात्यातून बॅंकांच्या खात्यांमध्ये जमा होईल. त्यानंतर बॅंकांकडे दिलेल्या यादीनुसार त्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी. चार दिवस दीपावलीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असल्याने सोमवारपासून (ता. 23) नियमितपणे रक्कम जमा होईल. तसा संदेश बॅंकांकडून शेतकऱ्यांना पाठवण्यात येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी करू नये, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. 

15 नोव्हेंबरपर्यंत कर्जमाफीचे 85 टक्के काम पूर्ण केले जाईल. अर्जात आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना कळवण्यात येईल. त्यानंतर त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. निकषात बसणारा शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत ही योजना सुरूच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिली. 

सरसकट कर्जमाफीचे  एकमेव राज्य - महसूल मंत्री 
महसूल मंत्री चंद्रकांत पाटील या वेळी म्हणाले, की आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षराने नोंदवण्यासारखा आहे. शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे. 

शेतीसाठी 62 हजार कोटी - अर्थमंत्री 
अर्थमंत्री मुनगंटीवार या वेळी म्हणाले, की अर्थसंकल्पात शेतीसाठी तिपटीने वाढ करत 62 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कृषी क्रांतीत महत्त्वाचा घटक असलेल्या वीज पुरवठ्यासाठी एक हजार 39 कोटी खर्च करण्यात आले. कर्जमाफी हा कृषी क्रांतीतील महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद निर्माण झाला आहे. 

मुख्यमंत्र्यांचे आभार 
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शैला दिनेश कदम (कोल्हापूर), चंद्रकांत पाटील (वाडा), प्रमोद गमे (नागपूर) यांनी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्राच्या इतिहासात स्वच्छ आणि प्रामाणिक कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नागपूर येथील शेतकरी गमे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com