गावगाडा ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

पुणे - संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवर एकीची वज्रमूठ आवळलेल्या शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे गावगाडा थांबला होता. मुंबई-पुण्यासह महानगरे आणि काही शहरे वगळता ग्रामीण भागांत ‘बंद’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोणतेही नेतृत्व नसताना हा ‘बंद’ यशस्वी करत शेतकऱ्यांनी आंदोलनाची धग कायम ठेवली आणि ‘जिंकल्याशिवाय थांबणार नाही,’ असा आत्मविश्‍वासही व्यक्त केला. संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सरकारमधून बाहेर पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

पुणे - संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीवर एकीची वज्रमूठ आवळलेल्या शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मुळे गावगाडा थांबला होता. मुंबई-पुण्यासह महानगरे आणि काही शहरे वगळता ग्रामीण भागांत ‘बंद’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोणतेही नेतृत्व नसताना हा ‘बंद’ यशस्वी करत शेतकऱ्यांनी आंदोलनाची धग कायम ठेवली आणि ‘जिंकल्याशिवाय थांबणार नाही,’ असा आत्मविश्‍वासही व्यक्त केला. संपूर्ण कर्जमाफीच्या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी सरकारमधून बाहेर पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. राज्यातील बाजार समित्या, कृषी सेवा केंद्रे, दूध डेअऱ्या, आठवडे बाजार आणि शेतकरी सभासद असलेल्या सहकारी संस्थांनी आज कडकडीत ‘बंद’ पाळला. सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन, अंत्ययात्रा, रास्ता रोको, घोषणाबाजी, सामूहिक मुंडण, वाहनांवर दगडफेक आदी विविध मार्गांनी निषेध व्यक्त झाला. अनेक गावांत शेतकऱ्यांना अटक होऊनही धग कायम होती. विविध भागांतील रास्ता रोकोंमुळे एसटीचे वेळापत्रक विस्कळित झाले; पण आंदोलकांनी बसगाड्यांना ‘लक्ष्य’ केले नाही, हे विशेष.

नाशिक जिल्ह्यात आंदोलनाची धग जास्त असल्यामुळे सरकारने या जिल्ह्यातील इंटरनेट सेवाच बंद केली होती. मालेगावजवळील करंजगाव तसेच सिन्नरजवळच्या वडांगळी येथे सरकारची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. येवला भागातील एरंडगावच्या शेतकऱ्यांनी सामूहिक मुंडण करून रास्ता रोको केला. 

उत्तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात ‘बंद’ यशस्वी झाला. धुळे, शिंदखेडा, साक्री व शिरपूर या भागांत ‘बंद’ची तीव्रता जास्त होती. जळगावात संमिश्र प्रतिसाद होता. यावल आणि रावेरला शिवसेनेने रास्ता रोको केले. 

सातारा जिल्ह्यात ‘बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागात पूर्ण ‘बंद’ होता. ठिकठिकाणी रास्तो रोको, मोर्चे, दूध व भाजीपाला रस्त्यावर टाकण्यात आला. पाचवडला महामार्ग रोखण्यात आला होता. दुधाची वाहतूक पोलिस बंदोबस्तात सुरू होती. विदर्भात नागपूरसह अन्यत्र ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. यवतमाळ जिल्ह्यातील अर्जुना येथे शेतकऱ्यांनी सरण पेटवा आंदोलन केले. मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांत ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला. उस्मानाबाद जिल्ह्यात सात बसगाड्यांवर दगडफेक झाली. वादात सापडलेले शेतकरी नेते जयाजी सूर्यवंशी अज्ञातवासात गेले असून, त्यांच्या बंगल्याभोवती  सुरक्षा ठेवली आहे.

अकोल्यात हिंसक पडसाद उमटले. रास्ता रोको करणाऱ्या आंदोलकांना अटक करण्यात
आली.  

‘बंद’च्या आघाडीवर...
मुंबई, पुणे वगळता नाशिक, औरंगाबाद, सातारा, बीड, लातूर, हिंगोली या शहरांमध्येही कडकडीत बंद, विदर्भातही तीव्र पडसाद; अनेक गावांत रास्ता रोको, दगडफेक; काही ठिकाणी शेतकऱ्यांना अटक व सुटका

सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गावा-गावांमधून अंत्ययात्रा, मुख्यमंत्री फडणवीस, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन

अनेक ठिकाणी भाजीपाला, दूध रस्त्यांवर; कोल्हापूर, सातारा आणि सांगलीहून पोलिस बंदोबस्तात दुधाचे टॅंकर मुंबईकडे रवाना  

शेतकरी कामगार पक्षाची राज्यभर निदर्शने; शिवसेनेचा ‘बंद’ला पाठिंबा; काँग्रेस, राष्ट्रवादीचाही आंदोलनात सहभाग 

शेतमालाविना ओस पडल्या बाजार समित्या; दूध संकलनात घट; आठवडी बाजारांसह काही ठिकाणी मुख्य बाजारपेठाही बंद 

मुंबई बाजार समितीत ‘बंद‘च्या धास्तीने आवक वाढली; पुणे बाजार समितीत भाजीपाल्यास उठाव नव्हता; मुंबईत डबेवाल्यांचे काळ्या फिती लावून समर्थन

Web Title: maharashtra news farmer strike farmer band