एेतिहासिक शेतकरी संपाला महाराष्ट्रात सुरवात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 जून 2017

शिर्डीत रस्त्यावर ओतले दूध
शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या करत शेतकरी संप सुरु झाला आहे. याचाच परिणाम म्हणून शिर्डीतील शेतकऱ्यांनी टँकरमधील दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केले.

मुंबई - शेतात जाणाऱ्या बळिराजाने नांगर खाली ठेवला असून, चक्क संपाचे हत्यार उपसले आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक शेतकऱ्यांच्या बेमुदत संपाला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरवात झाली असून, ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे. शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.

शेतकरी संपावर जात असल्याने दूध, भाजीपाल्याच्या पुरवठ्यावर 60 ते 70 टक्‍के परिणाम होण्याची शक्‍यता असल्याने राज्य सरकार धास्तावले आहे. आज पहाटे शिर्डी, मनमाड, नगर, सातारा याठिकाणी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर ओतून आंदोलनाला सुरवात केली. सरकारच्या विविध विभागांमधील समन्वय अभावामुळे शहरातील दूध, भाजीपाला पुरवठ्यावर संपाचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरची मंगळवारी रात्री उशिरा चर्चा फिसकटल्यानंतर "किसान क्रांती'ने आपला संपाच्या निर्णयावर ठाम राहण्याचा निर्धार केला. अन् संपाला सुरवात झाली. ऐन खरिपाच्या तोंडावर हा संप होत आहे. तीन वेळा प्रयत्न करूनही सरकारला संप रोखण्यात यश आले नाही. "किसान क्रांती'चे समन्वयक धनंजय दोर्डे पाटील यांनी, संपाला राज्यातील सर्व बाजार समित्यांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. तसेच शेतकऱ्यांचा या संपाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून, सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तोपर्यंत आमचा हा संप बेमुदत सुरू राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

संपाच्या परिणामस्वरूप भाजीपाल्यासह दूधपुरवठा तत्काळ प्रभावित होण्याची शक्‍यता असून, या पार्श्‍वभूमीवर मुंबई, पुणे, नागपूर आदी महानगरांत शेतीमाल ग्राहक दरात वाढ दिसून आली आहे. कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी, शेतकऱ्यांचे भांडण सरकारशी आहे, त्यासाठी आमच्याशी चर्चा करावी, असे सांगत दूध आणि भाजीपाला नाशवंत असतो तो शेतकरी फेकून देणार का, असा प्रश्‍न केला. शेतकऱ्यांनी स्वत:चेही नुकसान करू नये आणि शहरी नागरिकांनाही वेठीस धरू नये, असे आवाहन केले आहे.

शिर्डीत रस्त्यावर ओतले दूध
शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला योग्य भाव या शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या करत शेतकरी संप सुरु झाला आहे. याचाच परिणाम म्हणून शिर्डीतील शेतकऱ्यांनी टँकरमधील दूध रस्त्यावर ओतून आंदोलन केले.

साताराजवळ दुधाचे टँकर फोडले
कोल्हापूरहून मुंबईकडे जात असलेले वारणा दूधाचे टँकर मध्यरात्री साताऱ्याजवळ फोडण्यात आले. या संपाला हिंसक वळण लागू नये, यासाठी पोलिसांनी महामार्गावर बंदोबस्तात वाढ केली आहे.

Web Title: maharashtra news #farmerstrike begins in maharashtra