गटारीसाठी मुंबईला 25 लाख कोंबड्यांची उचल 

दीपक चव्हाण
सोमवार, 24 जुलै 2017

पुणे - आषाढ अमावस्या (गटारी) आजची आणि उद्याची (ता. 24) रविवारची सुटी असे जुळून आल्याने ब्रॉयलर कोंबड्यांची मागणी वाढली आहे. मुंबईकरांसाठी नाशिक आणि पुणे विभागातून 25 लाख कोंबड्यांची उचल झाली आहे. नाशिक विभागात कोंबड्यांना 62 रुपये किलो असा भाव मिळाला आहे. 

पुणे - आषाढ अमावस्या (गटारी) आजची आणि उद्याची (ता. 24) रविवारची सुटी असे जुळून आल्याने ब्रॉयलर कोंबड्यांची मागणी वाढली आहे. मुंबईकरांसाठी नाशिक आणि पुणे विभागातून 25 लाख कोंबड्यांची उचल झाली आहे. नाशिक विभागात कोंबड्यांना 62 रुपये किलो असा भाव मिळाला आहे. 

बाजारात गटारी अमावस्येमुळे कोंबड्यांना चांगला उठाव मिळाला; मात्र बाजारभाव उत्पादन खर्चाच्या खाली गेले. त्याचे प्रमुख कारण श्रावण सुरू होण्यापूर्वी सर्वांनाच माल काढण्याची घाई होती. "पॅनिक सेलिंग'मुळे आठवडाभरात कोंबड्यांचा बाजार पंधरा टक्‍क्‍यांनी कमी झाला होता. महाराष्ट्रात दिवसाला बारा लाख कोंबड्यांचे उत्पादन होते. त्यातील साठ टक्के उत्पादन मुंबईत खपते. आठवड्यातील अन्य दिवसांच्या तुलनेत शनिवार आणि रविवारसाठी दुपटीहून अधिक मागणी असते. यंदा गटारी अमावस्या आणि सुटी जोडून आल्याने नेहमीची मागणी तुलनेत दुपटीने वाढली. 

पुणे येथील पोल्ट्री उद्योजक पांडुरंग सांडभोर म्हणाले, की गटारीसाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत पंधरा टक्के अधिक विक्री झाली आहे. दुपारपर्यंत रांगा लावून ग्राहकांनी चिकनची खरेदी केली. शहराबरोबर ग्रामीण भागात खपात वाढ दिसली आहे. गुजरातमध्ये बाजार खाली आल्याने नाशिकमधील माल मुंबईकडे वळाला. परिणामी उत्पादन खर्चापेक्षा अधिक बाजारभाव मिळाला नाही; मात्र जुलैमध्ये सरासरी विक्री दर शेतकऱ्यांसाठी किफायतशीर ठरला आहे. 

मागील वर्षी श्रावणात अडीच किलोपेक्षा अधिक वजनाचे पक्षी "कॅरिओव्हर' झाले होते. वजन आणि संख्या या दोन्ही मात्रेत गेल्या वर्षी पुरवठा फुगला होता. यंदा तशी स्थिती नाही. सर्व "इंटिग्रेटर्स'नी मागणीनुसार उत्पादन कमी केले आहे. "ओपन फार्मर्स'कडील उत्पादन जवळ बंद आहे. उत्तर भारतातील श्रावण सुरू होऊन पंधरा दिवस झाले आहेत. तेथील "लिफ्टिंग' दर 60 रुपये किलोपर्यंत टिकला आहे. हे सूचिन्ह असून, पुढील काळातही बाजार किफायती राहतील, असे पुण्यातील पोल्ट्री उद्योजक डॉ. अजय देशपांडे यांनी सांगितले. 

ट्रेंड बदलतोय..! 

दरवर्षी श्रावण ते नवरात्र हा कालावधी खपाच्या दृष्टीने मंदीचा असतो. या दोन महिन्यांच्या कालावधीत बाजारभाव सहसा किफायती नसतोच. पोल्ट्री उद्योगाला होणाऱ्या तोट्यात या कालावधीतील विक्रीचा सर्वाधिक वाटा असतो; मात्र या वर्षी हा ट्रेंड बदलू शकतो, असे वेंकटेश्वरा हॅचरिजचे महाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगावकर यांचे म्हणणे आहे. ते म्हणाले, की पुढील दिवसांत ब्रॉयलर कोंबड्यांचा बाजारभाव आश्‍चर्यचकित करू शकतो. बाजार नेहमीचा ट्रेंड बदलून अनपेक्षितपणे किफायती राहण्याची शक्‍यता अधिक दिसते. 

Web Title: maharashtra news hen gatari amavasya