खंडोबाचा गाभारा होणार सोन्या-चांदीचा 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 जुलै 2017

जेजुरी - जेजुरीच्या खंडोबा मंदिरातील संपूर्ण गाभारा चांदीचा तयार करण्याचे मार्तंड देवसंस्थानचे नियोजन असून, याबाबत तयारीही सुरू झाली आहे. या कामासाठी सुमारे सहाशे साठ किलो चांदी लागणार आहे, तर गाभाऱ्यातील काही दर्शनी भागात सोन्याचा मुलामा देण्यात येणार आहे. देवसंस्थान व भाविकांच्या मदतीतून हे काम होणार आहे, अशी माहिती मार्तंड देवसंस्थानचे मुख्य विश्‍वस्त ॲड. वसंत नाझिरकर यांनी दिली.

 ॲड. नाझिरकर व विश्‍वस्त डॉ. प्रसाद खंडागळे यांनी देवसंस्थानच्या नियोजित कामाची माहिती दिली. मंदिरातील गाभारा सध्या मोकळा करण्यात आला आहे. चांदीच्या कामासाठी माप घेण्याचे काम सुरू आहे. रांका ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हे काम देण्यात आले आहे. संपूर्ण गाभाऱ्यावर चांदीची सजावट करण्यात येणार आहे. मंदिर शिखरास सोन्याचा मुलामा देण्याचे नियोजन असून, त्यासाठी दहा ते वीस किलोपर्यंत सोने लागणार आहे. त्याचेही नियोजन सुरू असल्याचे डॉ. खंडागळे यांनी सांगितले. खंडोबा मंदिरासाठी सुमारे चाळीस किलोवॅट वीज लागते. यासाठी ३५ लाख रुपये खर्चाचा ऊर्जाप्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार आहे. मुख्य मंदिर कळस, पंचलिंग मंदिर कळस व दीपमाळा, वेशीच्या डागडुजीचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर १४ लाख रुपये खर्चाची नवीन अत्याधुनिक रुग्णवाहिका पंधरा दिवसांत दाखल होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. दर्शनमंडप, स्वच्छतागृह आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आवश्‍यक असून भाविकांनी मदत करावी, असे आवाहन देवसंस्थानच्या वतीने करण्यात आले. दरम्यान, ‘कुलदैवत खंडोबा’ हे पुस्तक लिहिणारे डॉ. विठ्ठल ठोंबरे यांचा मार्तंड देवसंस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. या पुस्तकाचे लवकरच जेजुरीत प्रकाशन होणार असल्याचे डॉ. ठोंबरे यांनी सांगितले.

उल्हास भोर यांच्याकडून पाच लाख
चांदीच्या गाभाऱ्यासाठी मुंबईतील उद्योजक उल्हास भोर यांनी पाच लाख रुपयांची मदत दिली आहे. सहधर्मादाय आयुक्त शिवाजी कचरे यांनी एक किलो चांदी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. रांका ज्वेलर्सच्या पुणे अथवा मुंबई येथील दुकानात गाभाऱ्यासाठी चांदी स्वीकारली जाईल व तेथे रीतसर पावती दिली जाईल, असे डॉ. खंडागळे यांनी सांगितले.

Web Title: maharashtra news jejuri khandoba mandir

टॅग्स