कास पठारावरील रानफुलांवरच्या व्यावसायिक शेतीसाठी संशोधन 

गणेश कोरे
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

पुणे - रानफुलांचा अमूल्य ठेवा असलेल्या कास पठारावरील (जि. सातारा) फुलांवर संशाेधन करून, नवनवीन वाण विकसित करण्यात येणार आहेत. या संशाेधनातून निर्माण हाेणाऱ्या वाणांच्या व्यावसायिक विस्तारासाठी या फुलांची शेती करणे शक्य आहे का, यावर वन विभागाच्या सहकार्याने पुष्प संशाेधन संचालनालयाच्या वतीने संशाेधन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रकल्पाची आखणी संचालनालयाच्या वतीने सुरू आहे. लवकरच तज्ज्ञ, संशाेधक आणि शास्त्रज्ञांचा गट कास पठाराचा अभ्यास दाैरा करणार आहे. 

याविषयी माहिती देताना पुष्प संशाेधन संचालनालयाचे संचालक डॉ. के. व्ही. प्रसाद म्हणाले, की भारतामध्ये रानफुलांसाठी विशेष हॉटस्पॉट आहेत. या ठिकाणी निसर्गाचा अमूल्य आणि दुर्मिळ ठेवा आहे. या विविध फुलांमधील काही आॅर्किड इंग्रज त्यांच्याबराेबर घेऊन गेले. त्यांनी संशाेधन करून तेच वाण पुन्हा भारतात विक्री करत बाजारपेठ उपलब्ध केली. हे करत असताना अनेक दुर्मिळ फूल वनस्पती कमी हाेत गेल्या. महाराष्ट्रातील पश्‍चिम घाट परिसरात विविध रानफुले फुलतात. यामध्ये विशेषतः कास पठारावर विविधरंगी हजाराे जातींची फुले फुलतात. वाढत्या पर्यटनामुळे या फुलांच्या अनेक प्रजातींना धाेका निर्माण झाला आहे. सर्वसमान्य नागरिक, पर्यटक आणि शेतकऱ्यांना या दुर्मिळ ठेव्याचे महत्त्व जाणून देण्याबराेबरच या फुलांवर संशाेधनाचा प्रकल्प राबविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

निर्यातक्षम फुले उपलब्ध होतील 
येथील विविध फुलांना नागरी भागात स्थापित करण्यासाठी संशाेधन हाती घेण्यात येणार आहे. यासाठी संशाेधकांचा गट लवकरच कास पठारला भेट देईल. विविध फुलांचे आणि वनस्पतींचे नमुने संकलित करेल. या वनस्पतींवर संचालनालयात संशाेधन करून त्याचे व्यावसायिक वाण विकसित करता येतील का, यावरही संशाेधन केले जाणार आहे. ही प्रक्रिया दीर्घकालीन असून, भविष्यात चांगले वाण उपलब्ध झाल्यास शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीतून निर्यातक्षम शाेभिवंत फुले उपलब्ध हाेतील, असा विश्‍वास डॉ. प्रसाद यांनी व्यक्त केला. 

दुर्मिळ फुलांची काळजी घ्यावी 
कास पठारावर पर्यटकांच्या अनिर्बंध वागण्यामुळे दुर्मिळ फुले धाेक्यात आली आहेत. पर्यटकांनी केवळ फुले पाहण्याचा आनंद घ्यावा. फुले, वनस्पती ताेडणी, त्यावर चालणे, लाेळणे असे प्रकार करू नयेत, असे आवाहन डॉ. प्रसाद यांनी केले आहे. अन्यथा, भविष्यात कास पठारवर फुले शिल्लक राहणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

गुलछडी, शेवंतीचे वाण प्रसारित करणार 
पुष्प संशाेधन संचालनालयाच्या वतीने देशभरातील गुलछडीच्या २२, तर शेवंतीच्या विविध रंगांच्या १५० पेक्षा जास्त वाणांवर संशाेधन सुरू आहे. या विविध वाणांची प्रक्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. पुढील महिन्यात त्यांना फुले येतील. या वेळी राज्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांना हे प्रक्षेत्र पाहणीसाठी खुले करण्यात येणार असून, शेतकऱ्यांशी चर्चा करून विविध वाण प्रसारित करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: maharashtra news Kaas Pathar