माध्यान्ह भोजनात खिचडीच का? 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

मुंबई - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी कुपोषणाच्या विळख्यात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आल्यानंतर निकृष्ट माध्यान्ह भोजनात खिचडीच का, असा सवाल शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केला आहे. 

मुंबई - महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी कुपोषणाच्या विळख्यात असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आल्यानंतर निकृष्ट माध्यान्ह भोजनात खिचडीच का, असा सवाल शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी केला आहे. 

माध्यान्ह भोजनाच्या खालावलेल्या दर्जाच्या बाबतीत मुंबईचा सातवा क्रमांक लागतो. मुंबईतील माध्यान्ह भोजन निकृष्ट असल्यामुळेच मुलांचे कुपोषण होते. केवळ खिचडीवर वेळ मारून नेणाऱ्या पालिका शाळेतील अन्न बेचव असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत. माध्यान्ह भोजनासाठी इतर पदार्थांची तरतूद असतानाही केवळ खिचडीच का दिली जाते? खिचडीत मीठ, मसाला नसल्याने विद्यार्थी ती खात नाहीत, असे समान शिक्षण मूलभूत अधिकार समितीचे घनश्‍याम सोनार यांनी निदर्शनास आणले. 

मुंबई महापालिका आणि दिल्ली महापालिकेच्या माध्यान्ह भोजनाच्या दर्जाची तुलना केली तर दिल्ली सरस असल्याचे आढळते. दिल्ली महापालिकेच्या शाळेत मुलांना माध्यान्ह भोजनात विविध पदार्थ दिले जातात. त्यात खिचडीसह चिक्की, राजगिरा लाडू, अंडी, बदाम यांचाही समावेश असतो. दिल्लीत प्रथिनयुक्त आहार विद्यार्थ्यांना दिला जातो. देशाच्या आर्थिक राजधानीतील पालिका शाळांतील माध्यान्ह भोजन मात्र खाण्यालायक नसल्याचे सोनार यांनी सांगितले. पालिकेच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी 220 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पूर्वेकडील राज्यांच्या तुलनेत ही रक्कम फार मोठी आहे. माध्यान्ह भोजनाचा दर्जा सुधारण्यासाठी या रकमेचा योग्यरीत्या वापर करावा, अशी मागणीही सोनार यांनी केली.

Web Title: maharashtra news Khichadi municipal school