'कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांचा हात'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

मुंबई - दलित बांधवांवर कोरेगाव भीमामध्ये झालेला हल्ला हा पूर्वनियोजित असून, काही हिंदुत्ववादी संघटनांचा यात सक्रिय सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज केला. तसेच अफवांवर विश्‍वास न ठेवता सामाजिक सलोखा कायम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबई - दलित बांधवांवर कोरेगाव भीमामध्ये झालेला हल्ला हा पूर्वनियोजित असून, काही हिंदुत्ववादी संघटनांचा यात सक्रिय सहभाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज केला. तसेच अफवांवर विश्‍वास न ठेवता सामाजिक सलोखा कायम राखावा, असे आवाहनही त्यांनी केले.

पवार म्हणाले, ‘‘पुणे शहरातील काही हिंदुत्ववादी संघटनांनी मागील दोन ते तीन दिवसांपासून चिथावणी देण्याची भूमिका घेतली होती, असे तेथील स्थानिक लोक सांगत आहेत. त्यामुळे आधीपासूनच तेथे अस्वस्थतेचे वातावरण होते. कोरेगाव भीमा येथे लाखोंच्या संख्येने लोक येणार हे माहीत असताना यंत्रणेने खबरदारी घ्यायला हवी होती. ती प्रशासनाने न घेतल्यामुळे अफवा आणि गैरसमज  अधिक पसरल्यामुळे हा प्रकार घडला.’’

‘‘ कोरेगाव भीमाला दरवर्षी लोक जात असतात. आजपर्यंत कधीही तिथे  निकांसोबत संघर्ष झालेला नाही. भीमा कोरेगावमधील युद्धाला २०० वर्षे पूर्ण झाली; त्यामुळे मोठ्या संख्येने लोक येणार ही कल्पना होतीच. त्या ठिकाणच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न काही प्रवृत्तींनी घेतला असावा,’’ असेही शरद पवार म्हणाले.

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्‍त करत, अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता आणि संयम राखून समाजात फूट पाडणाऱ्या समाजविघातक शक्तींचा हा कुटिल राजकीय डाव हाणून पाडावा, असे आवाहन केले.

‘‘‘आरएसएस’शी संबंधित लोकांनी चार- पाच दिवसांपासून या परिसरात अफवा पसरवून परिस्थिती बिघडविण्याचे काम केले होते. याची पूर्ण कल्पना असतानाही पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाय केले नाहीत वा पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवला नाही. त्यामुळेच पुण्यातून आलेल्या काही समाजकंटकांनी हैदोस घालून हिंसाचार केला आणि पोलिसांनी काहीही कारवाई न करता फक्त बघ्याची भूमिका घेतली, अशी माहिती स्थानिकांकडून मिळते. त्यामुळे दलित आणि मराठा समाजांत भांडणे लावून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा काही समाघविघातक प्रवृत्तींचा डाव असून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारधारेला मानणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन लोकशाही मार्गाने लढा देऊन हा कुटिल राजकीय डाव हाणून पाडण्याची आवश्‍यकता आहे,’’ अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली.

Web Title: maharashtra news koregaon bhima Riot sharad pawar