विधानपरिषद पोटनिवडणुकीत  विरोधकांच्या ऐक्‍याची कसोटी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

मुंबई - विधान परिषदेच्या एका जागेसाठी गुरुवारी (ता. ७) पोटनिवडणूक होत आहे. विरोधी पक्षांच्या आमदारांच्या ऐक्‍याची या वेळी कसोटी लागणार आहे. भाजपला आगामी राजकारणात टीकेची संधी मिळू नये, यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आमदारांची मते फुटणार नाहीत याची काळजी दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घेतली आहे. याबाबत बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये दोन्ही पक्षांच्या आमदारांची बैठक झाली. 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्यासह दोन्ही पक्षांचे प्रमुख नेते व आमदार उपस्थित होते. काँग्रेसकडे ४२ आणि राष्ट्रवादीकडे ४१ आमदार आहेत. दोन्ही पक्षांच्या आघाडीने दिलीप माने यांना उमेदवारी दिली आहे. विरोधी पक्षांची ८३ आमदारांची एकगठ्ठा मते दिलीप माने यांना मिळतील, अशी रणनीती ठरवण्यात आली आहे. 

दरम्यान, भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना शिवसेनेचाही पाठिंबा असल्याने त्यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे; मात्र काँग्रेस व राष्ट्रवादीमधील काही मते फोडून विरोधकांचे ऐक्‍य मोडीत काढण्याचा प्रयत्न भाजप नेते करत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही आमदार फुटतील, असा दावाही भाजप नेते खासगीत करत आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे एकही मत भाजप उमेदवाराला पडणार नाही, असा ठोस दावा दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केला आहे. 

नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. गुरुवारी सकाळी ९ वाजता विधानभवनात मतदानाला सुरुवात होणार असून दुपारी मतमोजणी होईल. 

Web Title: maharashtra news Legislative Assembly voting congress NCP