भारनियमनावर लवकरच ऊर्जा विभागाची बैठक 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 18 सप्टेंबर 2017

मुंबई - राज्यात भारनियमनाने डोके वर काढलेले असताना आठवडाभराने का होईना; ऊर्जा विभाग लवकरच बैठक घेणार आहे. वीजनिर्मिती प्रकल्पाच्या ठिकाणी कोळसा टंचाईमुळे खासगी व महानिर्मितीच्या वीजनिर्मितीवर परिणाम झाला आहे. भारनियमनामुळे कृषी ग्राहकांच्या रात्रीच्या वीजपुरवठ्यात दोन तासांची कपात करण्यात आली आहे. रविवारी मात्र राज्यात कोणत्याही ग्राहक श्रेणीसाठी भारनियमन करण्यात आलेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. 

ऊर्जामंत्री, ऊर्जा विभागातील अधिकारी, महावितरण व महानिर्मिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आदींच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. सध्याच्या कोळसा टंचाईच्या संकटावर उपाययोजना आणि अल्प मुदतीसाठी वीज खरेदीसारख्या विषयावर बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. राज्यातील कृषी ग्राहकांची विजेची मागणी आणि वाढत्या उकाड्यामुळे मागणीत होणारी वाढ यासाठी बैठकीत तयारीही अपेक्षित आहे. 

रविवारी सुट्टीचा दिवस असताना विजेची मागणी 13 हजार मेगावॉट होती. कार्यालयांना सुट्टी असल्याने विजेची मागणी हजार मेगावॉटने कमी झाली. आज अल्पमुदतीच्या करारातून 400 मेगावॉट वीज मिळाली. तर पॉवर एक्‍सचेंजमधूनही 150 मेगावॉट वीज मिळाली. एरव्ही, महागड्या विजेसाठी ओळखला जाणारा रतन इंडियाचा एक वीजसंच बंद पडला. तर अदाणीच्या एका संचातून उद्यापासून वीजनिर्मिती सुरू होणे अपेक्षित आहे. 

पवन ऊर्जा प्रकल्प मदतीला 
राज्यात पावसामुळे पवन ऊर्जा प्रकल्पातून 700 मेगावॉट वीज मिळाली. पवन ऊर्जा प्रकल्पांची स्थापित क्षमता 3,632 मेगावॉट आहे. कोळसा टंचाईमुळे औष्णिक विजेवर परिणाम झाला असला; तरीही पवन ऊर्जा प्रकल्पांनी मदतीचा हात दिला आहे. पावसाळ्यात विजेची मागणी कमी असताना पवन ऊर्जा महागडी म्हणून महावितरणने नाकारली होती; पण राज्यात भारनियमन सुरू असताना या प्रकल्पातूनच महावितरणला दिलासा मिळाला. 

Web Title: maharashtra news load shedding