जैन मुनींवर राग म्हणजे शिवसेनेचा रडीचा डाव - माधव भांडारी

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

चोरटे अन्‌ भुरटे... 
मी संजय राऊत यांची मनस्थिती समजू शकतो. पराभव झाला, जनतेने नाकारले की बावचळलेली मनस्थिती होते. सर्व समाजातील लोकांना सोबत घेतले आणि आम्ही जिंकलो, याचा अभिमान आहे. त्यामुळे प्रश्‍न "मनी' आणि "मुनी'चा नसून "चोरटे' आणि "भुरटे' यांचा आहे, असा टोला भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी लगावला.

मुंबई - राज्याच्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवापासून शिवसेनेची अपयशाची मालिका सुरू आहे. मीरा - भाईंदर महापालिका निवडणुकीतील पराभवही त्यातीलच पुढची कडी आहे. लोक आपल्याला सातत्याने का नाकारतात, याची कारणे शोधण्याऐवजी शिवसेनेने आपल्या पराभवाचा राग जैन मुनींवर काढणे म्हणजे रडीचा डाव आहे, असे प्रत्युत्तर भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी बुधवारी दिले. 

भांडारी म्हणाले, की सर्वसंगपरित्याग करून पूर्णवेळ समाजासाठी काम करणाऱ्या मुनींवर आगपाखड करणाऱ्या शिवसेनेला हिंदुत्त्वाचा वारसा सांगायचा काहीही नैतिक अधिकार नाही. नयनपद्मसागर मुनींची तुलना दहशतवादी कारवायातील आरोपी असलेल्या एका धार्मिक प्रवचनकाराशी करणे ही शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी आहे. 

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या प्रत्येक महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत भाजपची ताकद वाढली आहे. ही शिवसेनेची खरी पोटदुखी आहे. 

Web Title: maharashtra news madhav bhandari bjp shiv sena