राज्यभर जनजीवन विस्कळित

राज्यभर जनजीवन विस्कळित

मुंबई -  कोरेगाव भीमा येथील दंगलीच्या निषेधार्थ डाव्या आणि दलित संघटनांच्या आवाहनानुसार आज राजधानी मुंबईसह राज्यभर बंद पाळण्यात आला. नाकाबंदी, तोडफोड, तसेच ‘रास्ता’ आणि ‘रेल्वे रोको’मुळे राज्याच्या अनेक भागांतील जनजीवन विस्कळित झाले. 

दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन बंद मागे घेत असल्याची घोषणा केली. कोरेगाव भीमा येथील हिंसेला जबाबदार असणारे शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अटक झाली नाही, तर मात्र आम्ही काही करू शकत नाही. लोकांना शांत करण्याच्या माझ्या मर्यादा असून, यापुढे शांतता राखण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी, असे त्यांनी नमूद केले. हा बंद शंभर टक्‍के यशस्वी झाला, तसेच काही तुरळक घटना वगळता बंद शांततेत पार पडल्याचे सांगतानाच आंबेडकर यांनी राज्यभरात १३० जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहितीही दिली. 

‘बंद’मुळे मुंबई पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, नागपूर, जळगाव या मोठ्या शहरांसह अनेक भागांतील जनजीवन ठप्प झाले होते. काही भागांत शेकडो खासगी गाड्या, एसटी व शहर वाहतूक बसेसना लक्ष्य करण्यात आले. खासगी वाहनांतून लोकांना उतरवून पायी जाण्याचा आग्रह आंदोलनकर्ते करत होते. अन्यथा, दगडफेक करून गाड्या फोडल्या जात होत्या. त्यामुळे अनेक ठिकाणी एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती. औरंगाबादमधील इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली होती. मुंबईत मेट्रोसह रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. राज्यातील सर्व मार्गांवर शुकशुकाट होता. सुटी जाहीर केलेली नसतानाही राज्याच्या अनेक भागांत शाळा-महाविद्यालयेही विद्यार्थ्यांअभावी ओस पडली होती.

दिवसभरातील पडसाद
‘बंद’मुळे मुंबई ठप्प, मेट्रो, रेल्वे, द्रुतगतीवर शुकशुकाट
मुंबईत एलबीएस रोडवर किमान हजारभर गाड्या फोडल्या 
मुंबईत काही गाड्या जाळण्याचाही प्रयत्न  
पुण्यात एसटी सेवा विस्कळित, कडकडीत बंद
कोल्हापूर बंदला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड, पोलिसांचा लाठीमार
कोल्हापूरला शिवसेनेचा गुरुवारचा नियोजित बंद मागे
सांगली जिल्ह्यात भिडेंच्या पोस्टरवर दगडफेकीमुळे तणाव
रत्नागिरीत निदर्शने, दुपारनंतर व्यवहार सुरळीत
किरकोळ दगडफेक वगळता सातारा जिल्ह्यात बंद शांततेत
औरंगाबादेत आंबेडकरनगरात लाठीमार, हवेत दोन फैरी
जालन्यात मोर्चा, नांदेडमध्ये पोलिसांचा लाठीमार
परभणीत संघ कार्यालयावर दगडफेक
नागपुरात टायर जाळले. यवतमाळ, अमरावती, गोंदिया, वर्ध्यात बससेवेवर परिणाम 
भंडाऱ्यात आमदार नाना शामकुळे यांच्या कार्यालयात तोडफोड
खामगावजवळ बसवर दगडफेक, अकोला शहरात रास्ता रोको
वाशीममध्ये बाजारपेठ दुपारपर्यंत बंद. बुलडाण्यात बसच्या काचा फोडल्या
नगर शहरासह जिल्ह्यात बंद
नाशिक शहर-जिल्ह्यात बंद, चार तास रास्ता रोको,
जळगाव शहर, जिल्ह्यात कडकडीत बंद. भुसावळला बसवर दगडफेक
सोलापूर जिल्ह्यात किरकोळ प्रकार वगळता बंद शांततेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com