दुधाच्या खरेदी किमतीत तीन रुपयांनी वाढ 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 जून 2017

खरेदी किमतीचा भार सरकार उचलणार असल्याने दुधाच्या विक्री दरावर मात्र याचा कोणताही परिणाम होणार नाही. 
- महादेव जानकर, दुग्धविकास मंत्री 

मुंबई - शेतकरी संपानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा होण्याबरोबरच राज्यातील दूधउत्पादक शेतकऱ्यांनाही दुधाच्या खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करण्याचे राज्य सरकारने आज जाहीर केले आहे. मात्र याचा भुर्दंड ग्राहकांवर पडू नये यासाठी खरेदी किमतीचा भार सरकार उचलणार असल्याने दुधाच्या विक्री दरावर मात्र याचा कोणताही परिणाम होणार नसल्याची ग्वाही पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी दिली. त्याचप्रमाणे सर्व कंपन्यांच्या दुधाचे दर हे सारखेच ठेवण्यासाठी राज्य सरकार कायदा करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

दूधउत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दुधाच्या खरेदी दरात तीन रुपये इतकी वाढ करण्यात आली असून, गायीच्या दुधासाठी खरेदी दर प्रतिलिटर 24 रुपयांवरून 27 रुपये, तर म्हशीच्या दुधासाठी खरेदी दर प्रतिलिटर 33 रुपयांवरून 36 रुपये करण्यात आला असल्याचे जानकर यांनी सांगितले. शासनाने दूधउत्पादकांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या दरात वाढ केली असली, तरी ग्राहकांचे हित लक्षात घेऊन दूध विक्रीदरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, की दूधउत्पादक शेतकऱ्यांना महाराष्ट्र संस्था अधिनियमनांतर्गत दूधखरेदी देयकाची रक्कम थेट त्यांच्या वैयक्तिक बॅंक खात्यावर ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येणार असून, यासाठी प्राथमिक सहकारी दुग्ध संस्था, तसेच अशी सेवा पुरवू शकणाऱ्या संबंधित जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका, राष्ट्रीयीकृत बॅंका, थेट लाभ प्रदानासाठी केंद्राने नेमलेल्या खासगी बॅंका यांच्याशी संपर्क साधून ऑनलाइन सुविधा असणाऱ्या बॅंकेत खाती उघडण्याच्या सूचना दिल्या आहेत. ही कार्यवाही दोन महिन्यांच्या आत सुरू करणे बंधनकारक करण्यात आले असून, ज्या प्राथमिक सहकारी दुग्ध संस्था या निर्देशाचे पालन करणार नाहीत, त्यांच्याविरुद्ध सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) यांच्यामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. 

दुग्ध व्यवसायांतर्गत येणाऱ्या शासकीय, सहकारी आणि खासगी या संस्थांचे दर समान राहण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून, दूध विक्री दराबाबत प्रदत्त समिती नेमण्यात आली आहे. ही समिती वर्षातून एकदा बैठक घेऊन महागाई निर्देशांकानुसार दूध खरेदी-विक्री दर निश्‍चितीसंदर्भात निर्णय घेणार आहे, असेही जानकर यांनी सांगितले. 

अशी असेल वाढ... 

- गाईच्या दुधासाठी ः प्रतिलिटरला 24 रुपयांवरून 27 रुपये 

- म्हशीच्या दुधासाठी ः प्रतिलिटरला 33 रुपयांवरून 36 रुपये 

Web Title: maharashtra news milk