मॉन्सूनचा उत्तरेकडे प्रवास 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) अर्धा देश व्यापला असून, उत्तरेकडील राज्यांत त्याचा प्रवास सुरू आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये राजस्थान, दिल्लीमध्ये तो दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागातर्फे सोमवारी वर्तविला आहे. 

पुणे - नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) अर्धा देश व्यापला असून, उत्तरेकडील राज्यांत त्याचा प्रवास सुरू आहे. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये राजस्थान, दिल्लीमध्ये तो दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागातर्फे सोमवारी वर्तविला आहे. 

मॉन्सूनच्या पुढील प्रवासासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे, त्यामुळे उत्तरेकडे मॉन्सूनची आगेकूच वेगाने सुरू आहे. नालिया, इदार, शाजापूर, सागर, सिधी, पटनापर्यंत मॉन्सून दाखल झाला आहे. त्याच वेळी कोकण, गोवा, उत्तराखंड, मध्य महाराष्ट्र, आसाम, मेघालय, कर्नाटक, केरळ, तमिळनाडूमध्येही मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रानंतर गुजरातमध्ये मॉन्सून दाखल झाला. गुजरातच्या उत्तर भागापर्यंतचा प्रवास त्याने पूर्ण केला आहे. सरासरी या भागापर्यंतचा प्रवास मॉन्सून 15 जूनपर्यंत पूर्ण करतो. या वर्षी मात्र तेथे दहा दिवस उशिरा पोचला असल्याचेही हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

ओडिशाचा उत्तर भाग आणि झारखंड या भागात सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, त्याचे ओडिशाच्या भागात चक्राकार वाऱ्यामध्ये रूपांतर होण्याची शक्‍यता आहे. राजस्थानचा पश्‍चिम भाग ते अंदमानच्या उत्तर भागादरम्यान कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र अंदमानकडून राजस्थानच्या दिशेने सरकत असून बंगालचा उपसागर, मध्य प्रदेश, छत्तीसगड व झारखंडचा भाग व्यापण्याची शक्‍यता आहे. तसेच, गुजरात ते केरळदरम्यान कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती तयार झाली आहे. पाकिस्तानच्या दक्षिण भागातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. गुजरातच्या परिसरातही चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. त्यामुळे देशातील बहुतांशी भागांत ढगाळ वातावरण आहे. परिणामी तापमानातही किचिंत घट झाली आहे. 

कोकणात मुसळधार पावसाची शक्‍यता 
कोकणातील काही भागात पुढील दोन दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आला आहे. विदर्भातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढेल. उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

तापमान घटले 
राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण असल्याने आणि हवेतील आर्द्रता वाढल्याने कमाल तापमानाचा पारा एक ते तीन अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाला आहे. पुढील दोन दिवस राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा कमी नोंदला जाईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. 

Web Title: maharashtra news monsoon