आगामी दोन दिवसांत मॉन्सूनला पोषक स्थिती 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 22 जून 2017

पुणे - अरबी समुद्रावरून वाहत येणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यामध्ये जोर नसल्याने राज्यात पाऊस पडत नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी (ता. 21) देण्यात आली. पुढील दोन दिवसांनंतर मॉन्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्‍यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

पुणे - अरबी समुद्रावरून वाहत येणाऱ्या नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यामध्ये जोर नसल्याने राज्यात पाऊस पडत नसल्याची माहिती हवामान खात्यातर्फे बुधवारी (ता. 21) देण्यात आली. पुढील दोन दिवसांनंतर मॉन्सूनच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्‍यताही अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

राज्यात मॉन्सून दाखल झाला असला तरीही दमदार पावसाची अद्यापही प्रतीक्षा आहे. मॉन्सूनच्या सर्वदूर पडणाऱ्या पावसाला अद्याप सुरवात झाली नाही. कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही भागांत आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, हा पाऊस स्थानिक वातावरणाचा परिणाम आणि हवेत असलेले बाष्प यामुळे पडत असल्याचे त्यांनी सांगितले. 

मॉन्सून आज विदर्भातील काही जिल्ह्यांत, छत्तीसगड, झारखंड आणि बिहारच्या आणखी काही भागात; तसेच ओरिसाच्या उर्वरित भागात दाखल झाला. मात्र, याचा प्रवास अत्यंत संथगतीने सुरू आहे. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर येथून मॉन्सून भारतीय भूखंडावर दाखल होतो; पण मॉन्सूनच्या या दोन्ही शाखांमध्ये जोर नाही. त्यामुळे मॉन्सूनमध्ये प्रगती होत नसल्याची माहिती देण्यात आली. अरबी समुद्रातून येणाऱ्या मॉन्सूनला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे या बाजूने प्रगती होत नसल्याचेही निरीक्षण खात्यातर्फे नोंदविण्यात आले आहे. 

ही परिस्थिती पुढील दोन दिवसांनंतर बदलण्याची शक्‍यता आहे. त्यासाठी अनुकूल बदल वातावरणात घडत आहे. त्यामुळे सध्या असलेली मॉन्सूनची उत्तर सीमा पुढे वाढेल. 

कोकणातील दक्षिण भागात काही ठिकाणी उद्या (ता. 22) मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. 

तापमान वाढले 
मध्य महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश भागांत पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे तापमानात वाढ झाली आहे. राज्यात सर्वाधिक कमाल तापमान जळगाव येथे 39.2 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. बहुतांश शहरांमधील कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा एक ते तीन अंश सेल्सिअसने वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. राज्यातील बहुतांश भागात ढगाळ हवामान असल्याने कमाल आणि किमान तापमानात किंचित घट झाली आहे. 

Web Title: maharashtra news mosoon weather