शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला तत्त्वत: मान्यता 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

‘सकाळ’मुळे प्रश्‍न धसास 
‘सकाळ’ने ‘यंदाच्या खरिपातील वित्तपुरवठा अडचणीत’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करून कर्जाच्या उपलब्धतेकडे लक्ष वेधले होते.  खासदार राजू शेट्टी यांनी सरकारसमवेत चर्चा करताना आज हा मुद्दा मांडला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. बैठकीनंतर ‘सकाळ’चा अंक कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्याकडे सुपूर्त केला. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरू होईल, अशी ग्वाही आज सरकारने दिली. ‘सकाळ’मुळे खरिपातील वित्तपुरवठ्याचा विषय धसास लागल्याची प्रतिक्रिया शेतकरी समन्वय समितीचे सदस्य राजू देसले यांनी नोंदवली.

मुंबई - शेतीवरील संकट लक्षात घेता, सर्वसाधारण कर्जमाफीला सरकार निकषांसह तत्त्वत: मान्यता देत असल्याची घोषणा उच्चाधिकार मंत्री समितीचे अध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली. आंदोलक शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या प्रतिनिधींशी सुमारे पाच तास झालेल्या चर्चेनंतर या कर्जमाफीसाठी ऑक्‍टोबरची वाट न पहाता प्रलंबित देणी असलेल्या शेतकऱ्यांचे जुने कर्ज रद्द करून उद्यापासून त्यांना बॅंक नवे कर्ज देणार आहे. या निर्णयामुळे आता उद्यापासूनचे आंदोलन रद्द करण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीची आणि राज्य सरकारच्या उच्चस्तरीय मंत्रिसमितीच्या सदस्यांची आज येथील सह्याद्री अतिथीगृहावर चर्चा झाली. या वेळी मंत्रिगटातील राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासह शेतकरी नेत्यांमध्ये रघुनाथदादा पाटील, खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, डॉ. अजित नवले, आमदार जयंत पाटील यांच्यासह सुकाणू समितीचे सदस्य उपस्थित होते. 

बैठकीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले, ""सरकारने सरसकट कर्जमाफीला निकषांसहित मंजुरी दिली आहे. आंदोलन काळातील सर्व प्रकरणे (मुद्दे माल सापडलेली सोडून) सरकार मागे घेणार आहे. दूध दरवाढही लवकरच घोषित केली जाईल.'' 

आंदोलक शेतकऱ्यांच्या वतीने बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले, ""धनदांडग्या शेतकऱ्यांची कर्जे माफ करून आम्हालाही करदात्यांवर भुर्दंड लादायचा नाही. सरकारने शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लढ्याला प्रतिसाद देत सकारात्मक घोषणा केल्यामुळे उद्यापासून पुकारण्यात आलेले बंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे.'' 

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 25 जुलैपर्यंत अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय शेतकरी नेत्यांनी आज जाहीर केला. कर्जमाफीची मागणी मान्य झाल्याने हा आमचा क्रांतिकारी विजय असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली; तर यशस्वी चर्चेने मार्ग निघाल्यामुळे सरकारनेही आपण शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यात पुढाकार घेतल्याचे सांगितले आहे. आजच्या निर्णयामुळे खरिपाच्या पेरणीसाठी अल्पभूधारक नव्याने कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ""शिवसेना संपात सहभागी असल्याने शेतकऱ्यांच्या वतीने या चर्चेत भाग घेतला. उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने हा निर्णय झाला आहे,'' असे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले; तर किसान सभेचे नेते अजित नवले यांनीही सरकारने प्रश्‍न सोडविण्यासाठी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेबद्दल संतोष व्यक्त केला. निर्णय जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी मंत्रिगटाने सविस्तर चर्चा केली. 

"या निर्णयामुळे मी आनंदित झालो आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घरावर बॉंब टाकण्याऐवजी मी आता गावागावात सुतळी बॉंब फोडून विजय साजरा करू,'' असे आमदार बच्चू कडू यांनी नमूद केले. रघुनाथदादा पाटील यांनीही हा तोडगा मान्य असल्याचे नमूद केले. 

दुधाच्या किमतीत वाटा 
या निर्णयाबरोबरच दूध उत्पादक संघांना साखर संघांच्या धर्तीवर 70 : 30 या प्रमाणात दुधाच्या किमतीत वाटा देण्याची घोषणा सरकारने केली आहे. दूध उत्पादकांना 70 टक्के वाटा; तर संघाला 30 टक्के वाटा अशीही रचना असेल. 

अशी फुटली कोंडी 
शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या प्रतिनिधींशी दुपारी चर्चेला प्रारंभ होण्यापूर्वीच मंत्रिगटाने आंदोलक शेतकऱ्यांशी यशस्वी संवाद साधला होता. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत, हे राजू शेट्टी आणि बच्चू कडू हे दोघेही मान्य करत असल्याने कोंडी फोडणे सोपे झाल्याचे समजते. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीच्या प्रारंभीच सरकारला कोणत्याही प्रकारे अडवणुकीची भूमिका घ्यायची नाही नाही, तर प्रश्‍नांची सोडवणूक ही आमची बांधिलकी आहे, असे स्पष्ट केले. शेकापचे नेते जयंत पाटील यांची या संदर्भातील भूमिका मोलाची होती, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. चर्चेत शेतकरी नेत्यांनी एका क्षणी सरसकट कर्जमाफीचा आग्रह धरला तेव्हा चंद्रकांतदादांनी तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. शेतकरीहित हेच प्रमुख सूत्र आहे, ते लक्षात घेत तो निर्णय प्रत्यक्षात आणण्यासाठी चर्चा सुरू ठेवा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचे धोरण स्वीकारले आहे, त्यात थोडा विस्तार करत आता शेतीशिवाय अन्य कोणतेही उत्पन्न नसलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी दिली जाणार आहे. 

‘सकाळ’मुळे प्रश्‍न धसास 
‘सकाळ’ने ‘यंदाच्या खरिपातील वित्तपुरवठा अडचणीत’ या आशयाचे वृत्त प्रसिद्ध करून कर्जाच्या उपलब्धतेकडे लक्ष वेधले होते. खासदार राजू शेट्टी यांनी सरकारसमवेत चर्चा करताना आज हा मुद्दा मांडला जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. बैठकीनंतर ‘सकाळ’चा अंक कार्यकर्त्यांनी शेट्टी यांच्याकडे सुपूर्त केला. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरू होईल, अशी ग्वाही आज सरकारने दिली. ‘सकाळ’मुळे खरिपातील वित्तपुरवठ्याचा विषय धसास लागल्याची प्रतिक्रिया शेतकरी समन्वय समितीचे सदस्य राजू देसले यांनी नोंदवली.

कर्जमाफीचा तपशील ठरविण्यासाठी मंत्रिगटाची उच्चाधिकार समिती शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीशी चर्चा करेल. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी एकवाक्‍यता निर्माण होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे राजकीय पक्षांशीही चर्चा केली जाईल. शेतकऱ्यांच्या हिताला भविष्यातही माझे सरकार सर्वोच्च प्राधान्य देईल. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल राज्य सरकारचे अभिनंदन. मात्र आता खरिपाची पेरणी तोंडावर आल्याने या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी; तसेच तत्त्वतः कर्जमाफीचे निकष तातडीने जाहीर करावेत. 
- शरद पवार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष 

पावसाळी अधिवेशनापर्यंत शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा झाला पाहिजे. २६ जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुन्हा आंदोलन केले जाईल.
- खासदार, राजू शेट्टी अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या आहेत; पण अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही जागरूक आहोत. या आंदोलनाच्या निमित्ताने सर्व शेतकरी नेते एकत्र आले, ही अभूतपूर्व घटना आहे.
- डॉ. अजित नवले, सदस्य, सुकाणू समिती 

सर्व गावांत सुतळी बाँब फोडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत करणार आहोत. रक्तदान करून सरकारच्या निर्णयाचे स्वागत करणार आहोत.
-आमदार बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार संघटना

Web Title: maharashtra news mumbai farmer strike loan