विरोधकांनी सरकारला घेरले 

विरोधकांनी सरकारला घेरले 

नागपूर - शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीच्या मुद्द्यावर घोषणाबाजी करत विरोधकांनी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सरकारला चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, 41 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्याची माहिती एक हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देण्याची तयारी असल्याचे विधानसभेत सांगितले. यानंतरही विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. याच मुद्द्यावर विधान परिषदेचे कामकाजही गोंधळामुळे दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. 

सरकारने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कर्जमाफीच्या 41 लाख शेतकऱ्यांची यादी कर्ज रकमेसह जाहीर लिहून द्यावी, असा आक्रमक पवित्रा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी विधानसभेत सोमवारी घेतला. त्याचवेळी, घोषणा होऊन सहा महिने झाले तरी कर्जमाफी न झाल्याने शेतकऱ्यांमागे बॅंकांकडून वसुलीचा तगादा सुरू असल्याचे सांगत विधान परिषदेतही विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. फसलेली शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीमुळे कपाशी उत्पादकांचे झालेले नुकसान, यवतमाळमधील शेतकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणाचे विधिमंडळाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजावर तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी सभागृहात आणि सभागृहाबाहेरसुद्धा या मुद्द्यांवरून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी, निदर्शने करीत वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, शंभर नव्हे; तर एक हजार रूपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला सरकार तयार असल्याचे प्रत्युत्तर दिले. 

सकाळी दहा वाजल्यापासून विरोधकांनी विधानभवनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. या वेळी विशेषतः शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. या वेळी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत सरकारविरोधाची धार अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर विरोधकांनी सभागृहातही कामकाजाला सुरवात झाल्यापासूनच सरकारवर टीकेचा भडिमार सुरू केला. त्यामुळे विधानसभेत गोंधळाचे वातावरण झाले. यातही सरकारने कामकाज उरकून घेण्याला प्राधान्य दिले. 

या वेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना मांडली. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सभागृहाचे कामकाज बाजूला ठेवा अशी मागणी त्यांनी केली. शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कर्जमाफी दिलेल्या 41 लाख शेतकऱ्यांची यादी कर्ज रकमेसह जाहीर करावी असे आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. कर्जमाफीनंतर 1500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी वाशीम जिल्ह्यातील शेतकरी ज्ञानेश्वर मिसाळ यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत मिसाळ यांनी सरकारला लिहिलेले पत्र सभागृहात वाचून दाखवले. या पत्राद्वारे मिसाळ यांनी अडचणीतील शेतकऱ्यांचे विदारक चित्र मांडले आहे. त्यामुळे राज्य सरकारने सरसकट कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, तसेच कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने एकरी 25 हजार रुपयांची मदत जाहीर करावी, अशी आग्रही मागणी विखे यांनी विधानसभेत, तर धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केली. 

विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे तुमचेच पाप असल्याचे सांगून विरोधक निव्वळ राजकारण करीत असल्याचा आरोप केला. मगरमच्छ के आसू गाळले जात असून मी शंभरच नव्हे; तर हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यायला तयार आहे. जे बोलू ते खरं बोलू, असा जोरदार प्रतिहल्ला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर केला. आघाडी सरकारनेच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. तुम्ही 2008 मध्ये अख्ख्या विदर्भाला जितके पैसे दिले, तेवढे आम्ही फक्त बुलडाण्याला दिले. या विषयावर जेव्हा चर्चेला उत्तर देऊ तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होईल असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. मात्र विरोधकांनी गोंधळ कायम ठेवल्याने कामकाज तहकूब करण्यात आले. 

कपाशीचे बोंड  मुख्यमंत्र्यांना भेट 
विधानसभेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना गुलाबी बोंडअळीने फस्त केलेले कपाशीचे बोंड भेट देऊन या प्रश्‍नाकडे लक्ष वेधले. 

सहा महिने होऊनही शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी मिळालेली नाही. मात्र, बॅंकांकडून कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांना पत्रे आली आहेत. बोंडअळीमुळे शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे. ही तर भाजप- शिवसेनेची बोंडअळी आहे. 
- धनंजय मुंडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद 

आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पानेच पुसली. कर्जमाफी दिलेल्या शेतकऱ्यांची नावे एक हजार रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जाहीर करू. शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी दिल्याशिवाय ही योजना बंद होणार नाही. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com