राणेंचा स्वतंत्र संघटनेचा "घट'

राणेंचा स्वतंत्र संघटनेचा "घट'

मुंबई - भाजपच्या वाटेवर असलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे गुरुवारी (ता. 21) घटस्थापनेच्या मुहूर्तावर सिंधुदुर्गाबरोबरच समस्त कोकणच्या विकासासाठी स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. महाराष्ट्रातील राजकारणासाठी शिवसेनेला निवडणुकीच्या दोन वर्षे आधी नाराज न करण्याची राज्यातील भूमिका आणि डॉ. नीलेश, नितेश या दोन्ही राणेपुत्रांना कोणतेही आश्‍वासन आताच न देण्याचा केंद्राचा पवित्रा हे भाजप प्रवेशातील दोन अडसर आहेत. 

लोकसभा व विधानसभा निवडणुकांत राणेंची मदत होईल, हे भाजपमधील बहुतांश नेत्यांना मान्य असल्याने राणेंची नवी आघाडी भाजपला पूरक ठरणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही दिवसांपासून राणे ठाण मांडून बसल्याने कार्यकर्त्यांचे मोहोळ पुन्हा त्यांच्याभोवती जमले आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांतून राणे यांची ताकद स्पष्ट होणार असून ती लक्षणीय असेल, हे त्यांचे विरोधकही मान्य करत आहेत. घटस्थापनेच्या मुहूर्तावर राणे नेमकी कोणती भूमिका घेतील, याबद्दल नवनवे अंदाज बांधले जात आहेत. या घोषणेबद्दलची संदिग्धता त्यांनी स्वत:ही कायम ठेवली आहे. राणे गुरुवारी पुन्हा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना लक्ष्य करणार असले तरी सोनिया गांधींविषयी काहीही न बोलून ते कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला दुखावणार नसल्याचेही समजते. नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी राणे यांनी कार्यकर्त्यांना खुल्या हाताने मदत करण्याचे धोरण कायमच ठेवले असल्याने त्यांच्या प्रत्येक निर्णयाकडे राजकीय वर्तुळातील प्रत्येकाचे लक्ष लागले आहे. 

कॉंग्रेसचे धोरण 
नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना सांभाळून घेण्याचे धोरण कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी कायम ठेवले होते. चव्हाण यांच्या निवडीला विरोध केल्यावरही मुख्यमंत्रिपदावरून त्यांनीच रदबदली करून राणेंवरील कारवाई टाळली होती. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आमदार नितेश यांना सांभाळून घेतले, याकडे कॉंग्रेस वारंवार लक्ष वेधून घेत आहे; मात्र भाजपने कोणतेही ठोस आश्‍वासन दिले नसताना राणेंनी सुरू केलेल्या चढाईला अंकुश लावण्यासाठी कार्यकारिणी बदलण्याचा निर्णय सिंधुदुर्गाबाबत घेतला गेला, असे एका नेत्याने सांगितले. आम्ही घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहोत, असे कॉंग्रेसतर्फे स्पष्ट केले जात आहे. आमदार नितेश यांच्यावर कोणतीही कारवाई विचाराधीन नसल्याचेही या नेत्याने सांगितले. 

शिवसेनेत पुन्हा "नार्वेकर पुराण' 

राणे यांचे आमदार पुत्र नितेश यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यामार्फत पुन्हा मुळाकडे परतण्याचा प्रस्ताव आमच्यासमोर मांडल्याचा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेत केवळ नार्वेकर यांनाच काय घडते ते माहीत असते, असेही नितेश राणे म्हणाले. त्यामुळे दुखावलेल्या शिवसैनिकांनी हे काय सुरू आहे, असा सवाल केला आहे. 2005 पासून नार्वेकर यांचे प्रस्थ वाढल्याने उद्धव यांना शिवसेना नीट चालवता येत नसल्याचा आरोप नारायण राणे यांनी जाहीरपणे केला होता. त्यामुळे राणे कुटुंबाच्या मते नार्वेकर नायक आहेत की खलनायक, असा प्रश्‍न बुधवारी विचारला जात होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com