‘एनजीटी’च्या निर्देशानुसार शेतीसाठी पाणी

यशपाल सोनकांबळे
गुरुवार, 27 जुलै 2017

मुंबई - सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीला देण्यासाठी मुंढवा जॅकवेल प्रकल्प उभारण्यात आला. त्यातून दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी सोडत असल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली, याबाबत बुधवारी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर ‘एनजीटी’च्या निर्देशानुसार शेतीसाठी पाणी विसर्जित केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबई - सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शेतीला देण्यासाठी मुंढवा जॅकवेल प्रकल्प उभारण्यात आला. त्यातून दुर्गंधीयुक्त व दूषित पाणी सोडत असल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात (एनजीटी) याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली, याबाबत बुधवारी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर ‘एनजीटी’च्या निर्देशानुसार शेतीसाठी पाणी विसर्जित केले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रश्नोत्तर सत्राची घोषणा केली. यात जॅकवेल प्रकल्पाबाबत सदस्य अनिल भोसले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. त्यावर लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प कमी आहेत. त्यामुळे संपूर्ण पाण्यावर प्रक्रिया करणे शक्‍य नाही. मुंढवा प्रकल्पातून अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी शेतीसाठी सोडले जात आहे, ही वस्तुस्थिती आहे. मुठा उजव्या कालव्यातून पाणी सोडताना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे पालन केले जात आहे. या प्रकरणी मुंढवा ग्रामपंचायतीने ‘एनजीटी’मध्ये याचिका दाखल केली असून, त्यांच्या निर्देशानुसार शेतीसाठी पाणी विसर्जित केले जाईल.’’ 

प्रकल्पबाधितांच्या प्रस्तावास लवकरच मंजुरी 
उरुळी देवाची व फुरसुंगी येथील कचरा डेपो प्रकल्पबाधितांना पुणे महापालिकेच्या सेवेत समाविष्ट करून घेण्याच्या प्रस्तावाला लवकरच अंतिम मंजुरी दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी लेखी उत्तरामध्ये स्पष्ट केले. या संदर्भात सदस्य शरद रणपिसे, रामहरी रूपनवर, संजय दत्त, भाई जगताप, हुस्नबानू खलिफे यांनी तारांकित प्रश्न विचारला होता.

फिरत्या खंडपीठाचा चेंडू उच्च न्यायालयात
गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या स्वतंत्र खंडपीठाच्या मागणीवर विधान परिषदेमध्ये बुधवारी प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर पुणे आणि कोल्हापूरसाठी ‘फिरते खंडपीठ’ स्थापन करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. मात्र, उच्च न्यायालयाकडून अद्याप अंतिम मंजुरी मिळाली नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रश्नोत्तर सत्र सुरू केले. त्यामध्ये सदस्य शरद रणपिसे, सतेज पाटील, संजय दत्त, रामहरी रूपनवर, हुस्नबानू खलिफे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याला लेखी उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘सन २०१५ मध्ये मंत्रिमंडळामध्ये फिरते खंडपीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. उच्च न्यायालयाने खंडपीठ स्थापन करण्याची शिफारस मुख्य न्यायमूर्ती यांच्याकडे केली आहे. त्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल.’’

खामगाव मावळ येथे पुलाचा प्रस्ताव मंजूर
खामगाव मावळ (ता. हवेली) येथे ग्रामीण रस्तेविकास कार्यक्रमांतर्गत नवीन पूल उभारणीसाठी ७५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. लवकरच त्याचे काम सुरू केले जाईल, असे आश्‍वासन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. खामगाव मावळमध्ये जुन्या पुलाची दुरवस्था झाल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी नवा पूल उभारावा, अशी मागणी विधानसभेत प्रश्नोत्तर सत्रात करण्यात आली. आमदार भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली होती; परंतु दुरुस्तीचे काम सुरू केले नसल्याची तक्रार तापकीर यांनी केली. त्यावर मुंडे यांनी नव्या पूल उभारणीची मागणी मान्य केल्याची माहिती दिली. अस्तित्वात असलेल्या जुन्या पुलाचे काँक्रिटीकरण सुरू आहे. ग्रामीण रस्तेविकास कार्यक्रमांतर्गत नवीन पूल उभारणीसाठी तरतूद केली असून, लवकरच याचे काम सुरू केले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

लैंगिक शोषण; दोषींवर कारवाई करू
ई-लर्निंगच्या पडद्यावर अश्‍लील चित्रफित दाखवून अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी त्रिसदस्यीय समितीचा अहवाल प्राप्त झाल्यावर दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिले. प्रश्नोत्तर सत्राला सुरवात करण्याची घोषणा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केल्यानंतर आमदार विजय काळे, भीमराव तापकीर, राधाकृष्ण विखे पाटील, संग्राम थोपटे, मिलिंद माने, संतोष टारफे, विजय वडेट्टीवार, अमिन पटेल, सुनील केदार, अमर काळे, हर्षवर्धन सपकाळ, अस्लम शेख, निर्मला गावित यांनी पुण्यातील बालसुधारगृहातील लैंगिक शोषण प्रकरणासंदर्भात प्रश्न उपस्थित केला. येरवडा येथील पं. जवाहरलाल नेहरू उद्योग केंद्रातून बालगुन्हेगार अंधाराचा फायदा घेऊन, कर्मचाऱ्यांना दमदाटी करून, पळून गेल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा पोलिस तपास सुुरू असल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी लेखी उत्तरामध्ये दिले. हा प्रश्न आमदार विजय काळे यांनी उपस्थित केला होता.

Web Title: maharashtra news NGT agriculture water