उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 23 मार्च 2018

मुंबई - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.

मुंबई - उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.

जळगाव येथे 15 ऑगस्ट 1990 रोजी उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती. यात जळगावसह धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश करण्यात आला होता. या विद्यापीठाची स्थापना केल्यानंतर काही वर्षांनी याला खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती.

यासाठी अनेक आंदोलनेदेखील झाली. अलीकडेच पाडळसे येथे झालेल्या लेवा पाटीदार समाजाच्या महाअधिवेशनात या आशयाचा ठरावदेखील संमत करण्यात आला होता. या पार्श्‍वभूमीवर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली. अधिवेशनात अर्थसंकल्पाच्या विभागवार चर्चेत खानदेशातील काही आमदारांनी यासंदर्भात मागणी केली होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची घोषणा केली.

शिक्षण विभागाच्या चर्चेला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यास शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विद्यापीठाला नाव देण्याची मागणी बऱ्याच काळापासून केली जात आहे. याला कुणाचा विरोध देखील नाही. मग याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी खानदेशातील अनेक सदस्यांनी याबाबत अनेकदा मागणी केली होती. खडसे यांच्याही सूचना आल्या आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Web Title: maharashtra news north maharashtra university bahinabai chaudhary devendra fadnavis