सरकारने शहरांना राजकीय अड्डे बनवले - नारायण राणे

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 29 जुलै 2017

मुंबई - नगरपालिका आणि नगरपंचायतीत थेट लोकांमधून नगराध्यक्ष व सरपंच निवडून देण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने या शहरांना राजकीय अड्डे बनवल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी (ता. 28) विधान परिषदेत केला. 

मुंबई - नगरपालिका आणि नगरपंचायतीत थेट लोकांमधून नगराध्यक्ष व सरपंच निवडून देण्याचा निर्णय घेऊन राज्य सरकारने या शहरांना राजकीय अड्डे बनवल्याचा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी (ता. 28) विधान परिषदेत केला. 

मुंबईसह अन्य शहारांतील नागरी सुविधांबाबत विरोधी पक्षांनी मांडलेल्या नियम 260 च्या प्रस्तावाविषयी राणे बोलत होते. राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये थेट लोकांमधून नगराध्यक्ष व सरपंच निवडून देण्याच्या निर्णयामुळे नगराध्यक्ष एका पक्षाचा, तर नगरसेवक दुसऱ्या पक्षांचे असे चित्र निर्माण झाले. यामुळे नगरपालिका व नगरपंचायतींमध्ये राजकीय भांडणांना सुरवात झाली असून, नागरी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे राणे यांनी निदर्शनास आणले. 

राणे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभाराचेही वाभाडे काढले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई महापालिकेला 152 वर्षे झाली. 25 ते 30 वर्षांत जगात काही शहरे अस्तित्वात आली. त्यात सिंगापूर, मलेशिया या शहरांचा समावेश होतो. ही शहरे पर्यटनदृष्ट्या सक्षम आहेत; परंतु मुंबईचा दर्जा का घसरला? मुंबईला अनेक बाबतीत महत्त्व असताना ती बकाल का झाली? विकास का झाला नाही? 152 वर्षांत शहराच्या विकासासाठी सत्ताधाऱ्यांनी काय काय दिवे लावले?, असा खोचक सवाल राणे यांनी शिवसेनेचे नाव न घेता केला. 

प्रत्येक पावसात मुंबईत पाणी तुंबत असताना सत्ताधाऱ्यांनी काहीही उपाययोजना केली नाही. मुंबईतील पदपाथवर भिकारी राहत आहेत. काही ठिकाणी अतिक्रमणामुळे पदपाथच उरलेले नाहीत. मे महिन्यात रस्त्यांची दुरुस्ती केल्यानंतर एका महिन्यात खड्डे पडले. काळ्या यादीत टाकल्या गेलेल्या कंत्राटदारालाच कामे का दिली जातात, याची चौकशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी करावी, अशी मागणी त्यांनी केली. 
कुडाळ, मालवणची अंतर्गत गटार योजना बंद करण्यात आली. अनेक शहरातील योजना अपूर्ण आहेत. केंद्राने निधी दिला नाही, म्हणून राज्य सरकारची काही जबाबदारी आहे की नाही, असा सवाल राणे यांनी केला. महाराष्ट्रासारखे प्रगत राज्य हागणदारीमुक्त करण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोपही त्यांनी केला. 

खड्डे "करून दाखवले' 
मुंबईत खड्डे जागोजागी करून दाखवले, गटारे तुंबवून दाखवली, डंपिंग ग्राउंड नाही, हे करून दाखवले, अशा शब्दांत राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घोषणेची खिल्ली उडवली. देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये विरोधी पक्षात होते, तेव्हा त्यांनी अनेक चांगली भाषणे केली; मात्र सत्तेत आल्यावर चांगली कामे करण्यास ते विसरले, अशी टीका केली. मुंबई महापालिकेचे 60 हजार कोटी रुपये फिक्‍स डिपॉझिटमध्ये का ठेवले आहेत, हा निधी मुंबईच्या विकासासाठी का वापरला जात नाही, असा सवालही त्यांनी केला. 

Web Title: maharashtra news politics narayan rane