Devendra Fadnavis Uddhav Thackeray
Devendra Fadnavis Uddhav Thackeray

'सीएम'साहेब! जाळपोळ करणारे शिवसेनेवाले समजायचे का?

उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी यांनी महाराष्ट्र बंदला पाठिंबा दिला. त्यांचे कार्यकर्ते मैदानात उतरल्याने शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळाली. त्यामुळेच मुख्यमंत्री चिडले. जाळपोळ करणारे कोण होते हे माहित आहे असे जर ते म्हणत असतील तर त्यांचा रोख शिवसेनेवर आहे असे समजायचे का? 

टीव्हीवरील एका चर्चेत स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधून केव्हा बाहेर पडणार? असा प्रश्‍न केला असता राजू शेट्टी वैतागले. आजच्या शेतकरी संपाविषयी बोला. सरकारमधून बाहेर पडण्याविषयी काही विचारू नका असे त्यांचे म्हणणे होते. असेच प्रश्‍न शिवसेनेलाही यापूर्वी हजारदा विचारून झाले असतील. मात्र फडणवीस सरकारमधील हे दोन घटकपक्ष कशाची आणि कुठल्या मुहूर्ताची प्रतीक्षा करताहेत हेच कळत नाही.

सरकारमध्ये राहायचे आणि सरकारलाच विरोध करायचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराविरोधात गऱ्हळ ओकायची. आम्ही सत्तेतून बाहेर पडू. आम्ही लाचार नाही. आम्ही एका पैशाचेही सरकारचे मिंधे नाही अशा फुशारक्‍या मारायच्या. जर हे सरकार ब्रिटिशांसारखे जुलमी आहे असे जर वाटत असेल तर सत्तेवर पाणी का सोडले जात नाही. वास्तविक राजू शेट्टी काय किंवा उद्धव ठाकरे काय ? या दोघांची अडचण झालेली दिसते. "धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतय' अशी अवस्था झाली आहे. या दोन्ही पुढाऱ्यांनी खमकेपणा दाखविण्याची गरज आहे. सत्तेत राहण्यापेक्षा आज जसे मैदानात उतरला आहात तसे उतरा म्हणजे फडणवीस सरकारला कळेल काय ताकद आहे ती ?

स्वाभिमानी सारख्या पक्षाने भाजपला निवडणुकीत पाठिंबा दिला. शेतकऱ्यांचीही सहानुभूती भाजपकडे वळवली. या सहानुभूतीला मोदींची जोड मिळाली. दोन्ही कॉंग्रेसचा सुपडासाप झाला. शिवसेना, स्वाभिमानी, राष्ट्रीय समाज पक्ष, आठवलेंचा गट आणि शिवसंग्रामची साथ मिळाल्याने भाजप सिंहासनावर बसला.

सत्तेवर आल्यानंतर मात्र भाजपने आपले खरे दात दाखवायला सुरवात केली. ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यांना सत्तेपासून दूर ठेवले. घटक पक्ष तेंव्हा लालदिव्यासाठी लाचार झाले. आठवले तर दररोज मी मंत्री होणार असे सांगत. त्यांना मंत्रिपदाचे कितीवेळा स्वप्न पडले असेल हे त्यांनाच माहीत. खूपच गयावया केल्यानंतर शेवटी राज्यमंत्रीपदाचे तुकडे घटक पक्षांना टाकले गेले.

पुढे पुढे तर मंत्रिमंडळात जे जे मंत्री बनले त्यांना भाजपच्या बाजूने वळविण्याची मोहीमच हाती घेण्यात आली. विरोधीपक्षात फूट पाडण्याऐवजी घटक पक्षातच फूट पाडण्याचे उद्योग सुरू झाले. हे स्वाभिमानीकडे पाहिल्यास दिसून येईल. शिवसेनेला तर इतक्‍यावेळा अडचणीत आणले की काही विचारू नका ! पण, शिवसेनेला जेव्हा जेव्हा डिवचले तेव्हा भाजप उघडा पडला हे वास्तव आहे.

राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे हे मोठे नेते आहेत. या दोघा नेत्यांनी जर हातात हात घातला. सत्तेच्या बाहेर पडले तर ते या सरकारला सळो की पळो करून सोडू शकतात. शेतकरी संपाला या दोघा नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत. शेतकऱ्यांच्या संपाला त्यामुळेच ताकद मिळाली हे नाकारता येणार नाही. या दोन्ही नेत्यांच्या सक्रिय सहभागामुळेच मुख्यमंत्र्यांची चिडचिड झाल्याचे दिसून येत आहे. मुंबईत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, "कर्जमाफीबाबत जे शेतकरी आहेत त्यांनीच चर्चेला यावे.'' याचा अर्थ असा होतो की शिवसेनेची मंडळी शेतकरी नाहीत? महाराष्ट्र बंददरम्यान ज्या हिंसक घटना घडल्या त्यामध्ये राजकीय पक्षांचा सहभाग होता असेही मुख्यमंत्री म्हणाले. आंदोलने हिंसक कोण करतो हे महाराष्ट्राला सांगण्याची गरज आहे. शिवसेना ही राडा संस्कृतीची जनक मानली जाते. त्यामुळे जाळपोळी शिवसेनेनेच केल्या असे तर त्यांना म्हणायचे आहे का ?

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा सरकारमधील हे दोन घटकपक्ष महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झाल्याचे दु:ख मुख्यमंत्र्यांना नक्कीच झाले असेल. शेतकरी संपावरून सरकार कधी नव्हे ते अडचणीत आले आहे. या संपाचा सरकारवर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. कोण जाणे ठाकरे-शेट्टी लवकरच सत्तेतून बाहेरही पडू शकतात. पण, ते केव्हा बाहेर पडणार हे देवच जाणो ! स्वाभिमानी बाहेर पडली म्हणून सरकारवर काही परिणाम होणार नाही. शिवसेना बाहेर पडली तर खऱ्या अर्थाने राजकीय भूकंप होऊ शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com