कॉंग्रेसच्या पत्रकार परिषदेवर पोलिसांची पाळत 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

सरकारने खालची पातळी गाठली 
चित्रीकरण करणाऱ्या पोलिसांना झापले 
पोलिस आयुक्‍तांकडे तक्रार 

मुंबई  - विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्रकार परिषदेत विनापरवाना घुसखोरी करत पाळत ठेवणाऱ्या पोलिसांमुळे आज पत्रकार परिषदेत खळबळ उडाली. साध्या वेशातील हे पोलिस मोबाईल कॅमेऱ्यातून प्रश्‍न विचारणारा पत्रकार व विखे पाटील यांचे चित्रीकरण करत असल्याचे लक्षात आल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींनीच आक्षेप घेतला. संबधित व्यक्‍ती पत्रकार नसून पोलिस असल्याचे सिद्ध झाल्यानंतर विखे पाटील व प्रवक्‍ते सचिन सावंत चांगलेच संतापले. हा प्रकार म्हणजे लोकशाहीचा घात असून, सरकारने खालची पातळी गाठल्याची टीका विखे पाटील यांनी केली. 

आजपर्यंत फोन टॅपिंग करून सरकार विरोधकांवर पाळत ठेवत होते. मात्र, आता सरकारची पोलिसांना पत्रकार परिषदेत पाठवून नेत्यांसह प्रश्‍नकर्त्या माध्यम प्रतिनिधींचेही चित्रिकरण करणे म्हणजे विरोधी पक्षनेत्याच्या अधिकारावरच गदा आणल्यासारखे आहे, अशी खंत विखे पाटील यांनी व्यक्त केली. 

पत्रकार परिषदेमधूनच त्यांनी पोलिस आयुक्‍तांना दूरध्वनी करत या पोलिसांना अशा प्रकारचे आदेश कोणी दिले, असा सवाल केला. तसेच या दोन्ही पोलिसांच्या विरोधात तक्रार करत आदेश देणाऱ्या वरिष्ठांवर कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली. 

Web Title: maharashtra news press conference of Congress