राज्यातील पाच जिल्ह्यांत 50 टक्के कमी पाऊस 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मुंबई - यंदा हवामान खात्याच्या भाकिताला पावसाने हुलकावणी दिली आहे. कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावतीमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. या जिल्ह्यांत गतवर्षीच्या तुलनेत सरासरी 40 ते 50 टक्‍के कमी पाऊस पडल्याने तिथे पुढील वर्षी पाणीटंचाई भासण्याची शक्‍यता आहे. 

मुंबई - यंदा हवामान खात्याच्या भाकिताला पावसाने हुलकावणी दिली आहे. कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावतीमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. या जिल्ह्यांत गतवर्षीच्या तुलनेत सरासरी 40 ते 50 टक्‍के कमी पाऊस पडल्याने तिथे पुढील वर्षी पाणीटंचाई भासण्याची शक्‍यता आहे. 

अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरींनी हात दिल्यामुळे पिके जगल्याने शेतकऱ्याला दिलासा मिळाला असला, तरी पावसाचे प्रमाण पुढील 15 दिवस असेच राहिल्यास पुढील वर्षी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्‍त होत आहे. गतवर्षी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत 85.7 टक्‍के पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र 77.8 टक्‍के (780.9 मिलिमीटर) पाऊस राज्यभरात झाला आहे. त्यातही विदर्भातील अमरावती आणि नागपूर महसुली विभागात जेमतेम 62 टक्‍के पाऊस पडला आहे. 

आपत्कालीन विभाग कोल्हापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया आणि अमरावती या जिल्ह्यांवर विशेष लक्ष ठेवून आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा या जिल्ह्यांत तब्बल 50 टक्‍के पाऊस कमी पडला असल्याने पुढील वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच या जिल्ह्यांत पाणीटंचाई भासण्याची शक्‍यता आहे. यवतमाळमध्ये आतापर्यंत 49.4 टक्‍के (गतवर्षी 75 टक्‍के), चंद्रपूरमध्ये 50.5 टक्‍के (गतवर्षी 84.1 टक्‍के ), कोल्हापुरात 51.3 टक्‍के (गतवर्षी 71.8 टक्‍के), गोंदियात 52.2 टक्‍के (69.3), अमरावतीत 63.2 टक्‍के (95.3) पावसाची सरासरी नोंद झाली आहे. 

राज्यात सर्वाधिक पावसाची नोंद नगर 140.6 टक्‍के (मागील वर्षी 92.5 टक्‍के), पुणे 128.1 टक्‍के (113 टक्‍के), ठाणे 127.4 टक्‍के (101.9 टक्‍के), पालघर 113 टक्‍के (110.6 टक्‍के), बीड 104. 3 (74.7 टक्‍के) टक्‍के इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे. 

Web Title: maharashtra news rain 50 percent less rain in five districts