उत्तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

पुणे - उत्तर कोकणात अतिवृष्टी, तर दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने गुरुवारी दिला. विदर्भात पावसाचा जोर चांगला राहणार असला तरीही मराठवाड्यात मात्र पावसाच्या हलक्‍या सरी हजेरी लावतील, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

पुणे - उत्तर कोकणात अतिवृष्टी, तर दक्षिण कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा इशारा हवामान खात्याने गुरुवारी दिला. विदर्भात पावसाचा जोर चांगला राहणार असला तरीही मराठवाड्यात मात्र पावसाच्या हलक्‍या सरी हजेरी लावतील, असेही खात्यातर्फे सांगण्यात आले. 

राज्याच्या बहुतांश भागात नैर्ऋत्य मोसमी पाऊस (मॉन्सून) पडत आहे. कोकणात संततधार सुरू आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, कोल्हापूर शहरांसह ग्रामीण भागात सातत्याने पावसाच्या सरी पडत आहेत. कोयनानगर, महाबळेश्‍वर येथे पावसाचा जोर होता. त्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा वाढत आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे राज्यातील बहुतांश नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून, धरणांतील साठाही वाढत आहे. 

पावसाचा जोर कायम राहणार 
मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग ते केरळदरम्यान कमी दाबाचा पट्टा आहे. हा पट्टा केरळकडून महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसामध्ये कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडतील, असेही हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले. 

पावसाचा अंदाज 
राज्यात शुक्रवारी (ता. 21) कोकण, मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, मराठवाडा, विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. शनिवारी (ता. 22) कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या सरी पडतील. 

पुण्यात सरासरीच्या 80 टक्के पाऊस 
शहरात जुलैच्या सुरवातीला मॉन्सूनमध्ये मोठा खंड पडला होता. मात्र गेल्या आठ दिवसांपासून मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला. त्यामुळे पावसाच्या सरी सातत्याने पडत आहे. जूनमध्ये पुण्यात सरासरी 139.9 मिमी पाऊस पडतो. यंदा 206 मिमी (सरासरीच्या तुलनेत 147 टक्के) पाऊस पडला. शहरात जुलैमध्ये सरासरी 286.6 मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत 230.3 मिमी म्हणजे 80 टक्के पावसाची नोंद गेल्या वीस दिवसांमध्ये झाली असल्याची माहिती कृषी हवामान विभागातर्फे देण्यात आली. 

पुण्यात गुरुवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत पाच मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारी सकाळी साडेआठपर्यंत 10.8 मिमी पावसाची नोंद झाली. 1 जूनपासून आतापर्यंत 324.7 मिमी पावसाची नोंद झाली. 

Web Title: maharashtra news rain