दमदार पावसामुळे तूट 9 टक्‍क्‍यांवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 30 ऑगस्ट 2017

पुणे - विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावासामुळे देशात नैर्ऋत्य मौसमी पाऊस (मॉन्सून) सरासरी गाठेल, असा विश्‍वास हवामान खात्यातर्फे व्यक्त करण्यात येत आहे. एक ते 15 ऑगस्ट यादरम्यान देशात सरासरीच्या 22 टक्के पाऊस कमी होता. 16 ते 28 ऑगस्टदरम्यान पडलेल्या पावसाने ही तूट 9 टक्‍क्‍यांपर्यंत कमी झाली आहे. देशात आतापर्यंत 91 टक्के पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान खात्यातील अधिकाऱ्यांनी दिली. 

यंदाच्या पावसाळ्यात उत्तर भारतात दमदार पाऊस झाला आहे. राजस्थान, सौराष्ट्र, कच्छ, गुजरात, आंध्र प्रदेशचा सागरी किनारा येथे पावसाने सरासरी ओलांडली आहे. महाराष्ट्रातही कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने सरासरी गाठली आहे. विदर्भात मात्र पावसाने अद्यापही ओढ दिली आहे; तसेच पूर्व मध्य प्रदेश, पश्‍चिम उत्तर प्रदेश, हरियाना, चंडिगड, दिल्ली, कर्नाटक आणि केरळच्या काही भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. 

थोडा दिलासा 
देशात ऑगस्टच्या मध्यापर्यंत मॉन्सूनने मोठी विश्रांती घेतली होती. त्यामुळे 1 ते 15 ऑगस्टदरम्यान देशभरात 78 टक्के पाऊस पडला होता. मात्र, 16 ते 28 यादरम्यान पडलेल्या पावसाने देशाला दिलासा मिळाला आहे. यादरम्यान 91 टक्के पाऊस पडल्याची माहिती हवामान खात्यातर्फे देण्यात आली. 

विदर्भात ओढ का? 
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा जमिनीवर येतो आणि पुढे त्याचा प्रवास पश्‍चिमेकडे होतो. त्यामुळे पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया या भागांत दमदार पाऊस पडतो. यंदाच्या पावसाळ्यात बंगालच्या उपसागरावर दोन वेळा कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्याचा प्रवास पश्‍चिमेकडे होण्याऐवजी तो उत्तर आणि आग्नेय दिशेने झाला. विदर्भात मॉन्सून उशिरा पोचला. त्यामुळे सुरवातीपासूनच विदर्भात पावसाने ओढ दिल्याचे दिसते, अशी माहिती हवामान खात्यातील तज्ज्ञांनी दिली. 

Web Title: maharashtra news rain