परतीच्या पावसाने सरासरी ओलांडली 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 ऑक्टोबर 2017

पुणे - "ऑक्‍टोबर हीट'च्या ऐवजी ढगांच्या गडगडाटांसह राज्याच्या विविध भागांत पाऊस कोसळत असल्याचे चित्र शुक्रवारी दिसले. मुंबई वगळता राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसामुळे ऑक्‍टोबरची सरासरी ओलांडली असल्याची माहिती हवामान विभागातर्फे देण्यात आली. येत्या शनिवारी (ता. 14) मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

राज्यात ऑक्‍टोबरच्या सुरवातीला उन्हाचा चटका वाढत होता. "ऑक्‍टोबर हीट'मुळे कमाल तापमानाचा पारा सरासरीपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअसने उसळल्याची नोंद हवामान विभागात झाली. याच दरम्यान राजस्थानमधून परतीच्या मॉन्सूनला सुरवात झाली. राज्याच्या बहुतांश भागात असलेले ढगाळ वातावरण, वाढलेली उष्णता यामुळे स्थानिक पातळीवर ढगांच्या गडगडाटांसह पाऊस सुरू झाला. याच दरम्यान झारखंड येथे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने पावसाचा जोर वाढला. या सर्वांचा परिणाम म्हणून राज्यात गेल्या बारा दिवसांमध्ये पावसाच्या दमदार सरी कोसळल्या आहेत. त्यामुळे एक ते 12 ऑक्‍टोबर या काळात कोकणासह, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. तर विदर्भात सरासरी गाठली असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. 

बंगालच्या उपसागरात हवेचे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे पुणे, अकोला, परभणी शहरांत जोरदार पाऊस पडला. कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत ढगाळ वातावरण होते, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

सोमवारपर्यंत हवामान कोरडे 
कोकण, गोव्यासह संपूर्ण राज्यात येत्या सोमवारपर्यंत (ता. 16) हवामान कोरडे राहण्याची शक्‍यता आहे. शनिवारी (ता. 14) कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, तर मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. राज्यात काही भागांत पुढील दहा ते पंधरा दिवस पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी बरसतील. काही ठिकाणी विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: maharashtra news rain