कोकण, पूर्व विदर्भात जोर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

पुणे - कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि मुंबईतील काही भागांत बुधवारी (ता. १९) पावसाची संततधार होती. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक आणि नगरच्या काही भागांत पावसाची रिमझिम सुरू होती. विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पावसामुळे कापूस, तूर, मूग, उडीद पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (ता. १८) रात्री विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टी झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. जोरदार पावसामुळे भामरागड परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला असून, दोघे जण पुरात वाहून गेले.

पुणे - कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि मुंबईतील काही भागांत बुधवारी (ता. १९) पावसाची संततधार होती. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नाशिक आणि नगरच्या काही भागांत पावसाची रिमझिम सुरू होती. विदर्भ, मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. पावसामुळे कापूस, तूर, मूग, उडीद पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मंगळवारी (ता. १८) रात्री विदर्भातील गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही भागांत अतिवृष्टी झाल्याचे हवामान विभागाने सांगितले. जोरदार पावसामुळे भामरागड परिसरातील शंभर गावांचा संपर्क तुटला असून, दोघे जण पुरात वाहून गेले. नागपूरसह वर्धा, भंडारा आणि यवतमाळमध्येही पावसाने हजेरी लावली.

 मंगळवारी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला असून कोकण, गोवा मराठवाडा व विदर्भातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्य स्वरूपाचा पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. त्यामुळे नद्या, नाले  भरून वाहू लागले असून, धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. कोकणातील विहार, तुलसी, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा आणि मध्य महाराष्ट्रातील गोदावरी, आंध्रा, कळमोडी ही धरणे भरून वाहू लागली आहेत. तसेच काही धरणे ५० टक्क्यांपर्यंत भरली आहे.

येत्या रविवारपर्यंत (ता.२३) कोकणातील बहुतांशी ठिकाणी मुसळधार पडण्याचा अंदाज आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी, तर दक्षिण महाराष्ट्र व मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आज (गुरुवारी) कोकणातील काही ठिकाणी जोरदार, तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला. 

Web Title: maharashtra news rain konkan