मुंबई, पुणे, कोकणात संततधार; मराठवाड्यात प्रतीक्षाच

टीम ई सकाळ
मंगळवार, 18 जुलै 2017

मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने
मुंबई : शहर व उपनगरात संततधार पाऊस सुरु असून, याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला आहे. पावसामुळे मध्य रेल्वे एक ते दीड तास उशीराने होत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर पावसाचा परिणाम झाला असून, भाज्यांची आवक कमी झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. सायन-पनवेल महामार्गावर वाहनांच्या रांगा आहेत.

पुणे : मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर काही दिवस ओढ दिलेल्या पावसाने राज्यभर बरसण्यास सुरवात केली आहे. तळ कोकणपासून नागपूरपर्यंत पाऊस पडत आहे. मात्र, मराठवाड्यात, पूर्व महाराष्ट्रात अद्याप पावसाची प्रतिक्षा आहे. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे.

नागपुरात मुसळधार पाऊस
नागपूर : मंगळवारी मध्यरात्री चार तासांत तब्बल 135 मिमी पावसाची नोंद झाली. यंदाच्या पावसाळ्यातील दुसरा उच्चांक आहे. गेल्या महिन्यात 27 जूनला एकाच दिवसात 111 मिमी पावसाची झाली होती. पुढील दोन दिवस विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पालघर जिल्ह्यातील धामणी धरणातून पाणी सोडले
पालघर : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने सोमवार संध्याकाळपासून पुन्हा जोरदार सुरुवात केली. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सुर्या प्रकल्पाचे धामणी धरण 76.94% भरले आहे. या धरणाचे 5 दरवाजे उघडले असून धामणी धरणातून 5100 क्युसेक व कवडास धरण मिळून 14300 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुर्या नदीद्वारे करण्यात येत आहे.

पुण्यातील चार धरणांतील पाणीसाठा साडेपाच टीएमसीने वाढला
पुणे: मागील पाच दिवसापासून पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या चारही धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असून १३ जुलैपासून आज (मंगळवार) सकाळपर्यंत चार धरणांतील पाणीसाठा देखील साडेपाच टीएमसीने वाढला आहे. अशी नोंद खडकवासला पाटबंधारे विभागाकडे झाली आहे. गेल्या पाच दिवसांत टेमघर येथे 380 मिमी, पानशेत येथे 299, वरसगावला 303 तर खडकवासला येथे 93 मिमी पाऊस पडला आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक उशीराने
मुंबई : शहर व उपनगरात संततधार पाऊस सुरु असून, याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाला आहे. पावसामुळे मध्य रेल्वे एक ते दीड तास उशीराने होत आहे. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटवर पावसाचा परिणाम झाला असून, भाज्यांची आवक कमी झाली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पहायला मिळाले. सायन-पनवेल महामार्गावर वाहनांच्या रांगा आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यातील 63 पैकी 28 धरणे भरली
रत्नागिरी : पावसाचा लपंडाव सध्या जिल्ह्यात सुरूच आहे. मात्र असे असले तरी यावर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. 63 पैकी तब्बल 28 धरणे १०० टक्के भरली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात 63 पैकी 60 लघु पाटबंधारे प्रकल्प आहेत, तर 3 मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा :

Web Title: maharashtra news rain in maharashtra