निम्मा महाराष्ट्र कोरडाच 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

पुणे - अर्धा पावसाळा संपल्यानंतरही निम्मा महाराष्ट्र कोरडा असल्याचे भीषण वास्तव आहे. त्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रबरोबर पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचा समावेश आहे. 

पुणे - अर्धा पावसाळा संपल्यानंतरही निम्मा महाराष्ट्र कोरडा असल्याचे भीषण वास्तव आहे. त्यात मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रबरोबर पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांचा समावेश आहे. 

पावसाळ्यातील जून ते 13 ऑगस्ट या सुमारे अडीच महिन्यांमध्ये पडलेल्या पावसाचे विश्‍लेषण हवामान खात्यातर्फे करण्यात आले. त्यातून ही माहिती पुढे आली आहे. जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांच्या मध्यावधीनंतर राज्यात पावसाने जोर धरला होता. मात्र, ऑगस्टमध्ये श्रावणधारांनीही पाठ फिरवली आहे. कोकण, घाटमाथा वगळता राज्याचा उर्वरित भागात पावसाची एखादी हलकी सर हजेरी लावत आहे. त्यामुळे जुलैअखेरपर्यंत राज्यात 10 जिल्ह्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याचे चित्र होते. आत ऑगस्टच्या मध्यापर्यंत अशा जिल्ह्यांची संख्या वीस झाली आहे. त्यामुळे अर्धा पावसाळा संपला तरीही निम्मा महाराष्ट्र कोरडा असल्याचे या विश्‍लेषणातून स्पष्ट झाले आहे. 

जून ते ऑगस्ट या दरम्यान राज्यात पुणे आणि नाशिक या दोनच जिल्ह्यांमध्ये पावसाने तेथील सरासरी ओलांडली आहे. ऑगस्टमध्ये मात्र पुणे जिल्ह्यात 17 टक्के पाऊस पडल्याची माहितीही समोर आली आहे. बारामती, इंदापूर, पुरंदर, शिरूर या तालुक्‍यांमध्ये पावसाने ओढ दिल्याचेही यातून दिसते. 

कोकण 
मुंबईमध्ये सरासरीपेक्षा -25 टक्के पावसाची नोंद झाली आहे. त्या व्यतिरिक्त पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे पावसाने सरासरी गाठली आहे. 

पश्‍चिम महाराष्ट्र 
पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे; तर नगर, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये काठावर सरासरी गाठली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तेथे सरासरीपेक्षा वजा 20 ते 59 पाऊस पडला आहे. 

उत्तर महाराष्ट्र 
उत्तर महाराष्ट्रातही चारपैकी नाशिक येथे सरासरीच्या 54 टक्के पाऊस पडला आहे. नंदूरबार येथे पावसाने सरासरी गाठली आहे; तर धुळे आणि जळगाव दुष्काळी जिल्हे मात्र अद्यापही कोरडे आहेत. 

मराठवाडा 
दुष्काळी समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यात यंदाच्या पावसाळ्यात सुरवातीला चांगला पाऊस पडला. मात्र, जुलैमध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे मराठवाड्यावर पुन्हा दुष्काळाची टांगती तलवार असल्याचे चित्र दिसत असल्याची निरीक्षण हवामान खात्याने नोंदविले. औरंगाबाद (-38), जालना (-39), परभणी (-47), हिंगोली (-34), नांदेड (-32), लातूर (-30) या जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत -20 ते 59 टक्के पाऊस पडला आहे; तर बीड आणि उस्मानाबाद येथे सरासरी इतका म्हणजे -19 ते 19 टक्के पाऊस पडल्याचेही हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. 

विदर्भ 
विदर्भात यंदा मॉन्सून उशिरा पोचला. त्यामुळे जूनच्या सुरवातीला पावसाने हजेरी लावली नव्हती. मात्र, त्यानंतर विदर्भातील 11 पैकी फक्त वर्धा या एका जिल्ह्यात सरासरी इतका पाऊस पडला. उर्वरित सर्व जिल्हे कोरडे आहेत. पश्‍चिम विदर्भातील अमरावती (-40), यवतमाळ (-39), बुलडाणा (-21), वाशीम (-28), अकोला (-35), पूर्व विदर्भातील भंडारा (-33), गोंदिया (-37), नागपूर (-22), चंद्रपूर (-32) आणि गडचिरोली (-20) येथे पावसाने दडी मारली आहे. 

Web Title: maharashtra news rain weather