समज्ञा ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

पुणे - रूपसंपदा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘सौंदर्यवती’ होण्याच्या स्वप्नाकडे झेपावणाऱ्या राज्यातील ३२ तरुणींमध्ये रंगलेली  ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’ प्रस्तुत ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१८’ या स्पर्धेची उत्सुकता अखेर शनिवारी (ता. १७) संपली. पुण्याच्या समज्ञा ढवळेश्‍वर हिने ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१८’ हा मानाचा किताब पटकाविला, तर पुण्याच्याच प्रिया सिंग आणि तबस्सुम मुल्ला या उपविजेत्या ठरल्या. 

पुणे - रूपसंपदा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर ‘सौंदर्यवती’ होण्याच्या स्वप्नाकडे झेपावणाऱ्या राज्यातील ३२ तरुणींमध्ये रंगलेली  ‘पु. ना. गाडगीळ अँड सन्स’ प्रस्तुत ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१८’ या स्पर्धेची उत्सुकता अखेर शनिवारी (ता. १७) संपली. पुण्याच्या समज्ञा ढवळेश्‍वर हिने ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०१८’ हा मानाचा किताब पटकाविला, तर पुण्याच्याच प्रिया सिंग आणि तबस्सुम मुल्ला या उपविजेत्या ठरल्या. 

या स्पर्धेत ३२ तरुणींनी सौंदर्यासह आपल्या बौद्धिक क्षमतेचीही चुणूक दाखवली. त्यातील दंत वैद्यकशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या समज्ञा हिने आपल्या कौशल्यांच्या जोरावर ही स्पर्धा जिंकली. ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार आणि ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’चे मालक अजित गाडगीळ यांच्या हस्ते विजेतेपदाचा ‘मुकुट’ समज्ञाला घालण्यात आला. आपण विजेते ठरलोय, हे ऐकताच समज्ञासह तिच्या आई-वडिलांचेही डोळे पाणावले अन्‌ ‘स्वप्नांकडे झेप घेण्यासाठीचे हे पहिले पाऊल म्हणजे ही स्पर्धा होय,’ अशी प्रतिक्रिया समज्ञाने दिली.  

प्रिया सिंग हिला चित्रपट निर्माते नानिक जयसिंघानी आणि ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप द्विवेदी यांच्या हस्ते, तर तबस्सुम मुल्ला हिला अभिनेत्री मृणाल कुलकर्णी आणि ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’च्या डॉ. रेणू गाडगीळ यांनी उपविजेत्याचा ‘मुकुट’ घातला. सौंदर्य आणि बुद्धिमत्तेची चुणूक दाखवत कमालीची जिद्द घेऊन महाराष्ट्रातील तरुणींनी स्पर्धेची अंतिम फेरी गाजवली. रॅम्पवॉकसह ‘टॅलेंट हंट’ आणि बुद्धिमत्ता चाचणी फेरीत आपले कौशल्य दाखवत त्यांनी परीक्षकांसह उपस्थितांवर छाप पाडली. प्रख्यात दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, अभिनेते समीर धर्माधिकारी, अदिती गोवित्रीकर, निर्माते नानिक जयसिंघानी, नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव आणि डॉ. रेणू गाडगीळ यांनी स्पर्धेच्या अंतिम फेरीचे परीक्षण केले. 

स्पर्धेतील पहिल्या फेरीत पारंपरिक वेशभूषेत ३२ तरुणींनी ग्लॅमरस अंदाजात रॅम्पवॉक करून उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यातून निवडलेल्या १२ तरुणींनी ‘टॅलेंट हंट’ फेरीमध्ये अभिनय, नृत्य आणि गायनाचे कौशल्य दाखवत उपस्थितांसह परीक्षकांचीही दाद मिळवली. त्यातील ६ तरुणींची बुद्धिमत्ता चाचणी फेरीसाठी निवड झाली. अदिती कण्याळकर (नाशिक), नेहा शिवशरण (सोलापूर) यांच्यासोबत पुण्यातील समज्ञा, प्रिया, तबस्सुम आणि सुश्‍मिता भंडारी यांच्यात ही फेरी रंगली. परीक्षकांच्या प्रश्‍नांची त्यांनी निर्भीडपणे उत्तरे दिली. त्यात समाज्ञा, प्रिया आणि तबस्सुम यांनी बाजी मारली. या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या तरुणींनी आपले वेगळेपण सिद्ध करून दाखवले. स्पर्धकांमधील इतर उर्वरित तरुणींना स्पर्धेच्या प्रायोजकांच्या हस्ते ब्यूटीफुल हेअर, ब्यूटीफुल स्माइल असे विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या रंगतदार सोहळ्यात ‘एमजे ग्रुप’ने आपल्या नृत्याने, गायक रोहित राऊत याने गायकीने उपस्थितांना ठेका धरायला लावला, तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि संस्कृती बालगुडे यांच्या नृत्याच्या जुगलबंदीने कार्यक्रमात रंगत आणली. मुंबई, सोलापूर, पुणे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर आणि नागपूर या आठ विभागांमधील तरुणींमध्ये स्पर्धेची अंतिम फेरी झाली. अभिनेता अमेय वाघ आणि नेहा देशपांडे यांनी या शानदार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

Web Title: maharashtra news sakal beauty of maharashtra 2018