भाजपच्या काळात वाढल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या - शरद पवार

भाजपच्या काळात वाढल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या - शरद पवार

मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या आतामहत्यांचा आलेख वाढला असल्याची खंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज व्यक्त केली. पक्षाच्या "वकील सेल'च्या बैठकीत ते बोलत होते. 

""आघाडी सरकारच्या कार्यकाळात शेतकरी आत्महत्या होत होत्या, मात्र त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी आमच्या सरकारने ठोस प्रयत्न केले. मात्र भाजप सरकार हे शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यात अपयशी ठरले असून, सरकारची अनास्था शेतकरी आत्महत्या वाढण्यास कारणीभूत आहे,'' अशी टीका पवार यांनी केली. 

""आमच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत होत्या तेव्हा आम्ही त्याची कारणमीमांसा केली. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्ससारख्या संस्थांकडून अहवाल मागवले. त्यात कर्जबाजारीपणा हे कारण समोर आल्यावर पीककर्ज 12 टक्‍क्‍यांवरून 3 टक्‍क्‍यांवर आणले. 70 हजार कोटींची कर्जमाफी केली. तेही कोणतेही फॉर्म भरून न घेता. शेतीमालाला भाव दिला तेव्हा कुठे आत्महत्यांची संख्या कमी झाली. आज ती संख्या पुन्हा वाढत आहे,'' याबद्दल पवार यांनी खंत व्यक्त केली. 

कोळशाचे नियोजन नाही 
सध्या राज्यात भारनियमानाचे संकट पुन्हा ओढावले असून, वीजनिर्मितीच्या बाबतीत स्वयंपूर्ण असलेल्या महाराष्ट्रात विजेचा तुटवडा हे सरकारच्या निष्काळजी पणाचे लक्षण असल्याची टीका शरद पवार यांनी केली. ""राज्यातील आगामी संकट ओळखून 22 ऑगस्ट रोजी मी स्वतः सरकारला पत्र लिहून कळवले होते, की वीज कंपन्यांना लागणारा कोळसा कमी आहे. त्यानुसार पावसापूर्वी कोळशाचा स्टॉक करावा. त्यावर तातडीने पावले उचलण्याची गरज होती. मात्र तेवढी तसदी सरकारने घेतली नाही. त्यामुळेच आज मुंबई सोडून सर्व ठिकाणी आठ-आठ तास भारनियमन होत आहे. पाऊसकाळ चांगला झाला. विहिरी भरल्या. पण शेताला पाणी द्यायला वीज नाही, अशी परिस्थिती उद्‌भवली आहे,'' असे पवार म्हणाले. 

वकिलांनी पुढे यावे 
तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्यांचे मूलभूत अधिकार नोटिसा पाठवून दाबले जात आहेत. दलित व स्त्रियांवर अत्याचार वाढायला लागले आहेत. सावकारी कर्जाच्या जाळ्यात शेतकरी अडकला आहे. सावकार विरोधी कायद्यांची अंमलबजावणी होत नाही. लोकांचे खरे प्रश्न तालुका पातळीवर असतात. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या "लीगल सेल'ने सामान्यांची लूट थांबविण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. 

दिवाळी कशाची? 
""पंतप्रधान म्हणतात 15 दिवस आधीच दिवाळी आली, ती कशाची ते कळत नाही. नोटाबंदीनंतर पहिले काही दिवस उत्साहाचे वातावरण होते. मात्र ते लवकरच मावळले. बॅंकेच्या रांगेत सर्वसामान्य माणसे उभी होती, टाटा, बिर्ला नव्हते. जीएसटीसाठी कॉंग्रेसच्या काळात पंतप्रधान मनमोहनसिंग यांना सांगून मी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्यास सांगितले होते. त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र मोदी यांनी "जीएसटी'च्या विरोधात सर्वांत जास्त आक्रमक भाषण केले होते आणि आज त्यांनीच "जीएसटी' अमलात आणला आहे. उलट "जीएसटी' दर 28 टक्‍क्‍यांवर नेला,'' अशी टीका पवार यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com