मिखाईललाही संपवायचे होते... 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 जुलै 2017

मुंबई - शीना बोरा आणि मिखाईल या दोघांचीही हत्या करण्याची योजना इंद्राणी मुखर्जीची होती, अशी साक्ष इंद्राणीचा चालक श्‍यामवर राय याने शुक्रवारी सत्र न्यायालयात दिली. शीना बोरा हत्या प्रकरणात तो माफीचा साक्षीदार आहे. त्याची साक्ष नोंदविण्यास सुरवात झाली आहे. 

मुंबई - शीना बोरा आणि मिखाईल या दोघांचीही हत्या करण्याची योजना इंद्राणी मुखर्जीची होती, अशी साक्ष इंद्राणीचा चालक श्‍यामवर राय याने शुक्रवारी सत्र न्यायालयात दिली. शीना बोरा हत्या प्रकरणात तो माफीचा साक्षीदार आहे. त्याची साक्ष नोंदविण्यास सुरवात झाली आहे. 

शीना बोराची हत्या 2012 मध्ये झाली होती; पण हत्येचा उलगडा 2015 मध्ये झाला. इंद्राणीचा चालक असलेल्या श्‍यामवर याला एका प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्या वेळी इंद्राणी मुखर्जीने शीना बोराची हत्या केल्याचे उघड झाले होते. श्‍यामवरच्या जबाबावरून हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्नाला अटक केली होती. रायने या घटनेचा संपूर्ण घटनाक्रम पोलिसांना यापूर्वी सांगितला असून, तिघांनीही शीनाच्या हत्येचा कट कसा पूर्ण केला, याचे वर्णन दिले आहे. ही माहिती आज साक्षीदरम्यान न्यायालयाने नोंदवून घेतली. 

मार्च 2012 मध्ये इंद्राणीने तिचा सहायक काजल शर्माच्या मार्फत संपर्क साधला होता. स्काइप व्हिडिओ कॉलद्वारे इंद्राणीने संपर्क साधला होता. त्या वेळी शीना आणि मिखाईलची हत्या करण्याबाबत सांगितले होते, अशी साक्ष नोंदविण्यात आली. 

शीना आणि मिखाईलमुळे इंद्राणीच्या समाजातील प्रतिष्ठेला धक्का लागत असल्याने, त्यांना संपविण्याचा कट रचल्याचीही माहिती त्याने न्यायालयात दिली. शीना आणि मिखाईल इंद्राणीची मुले होती. याच मुद्‌द्‌यावर दोघे इंद्राणीला धमकावत असल्याने, इंद्राणीने त्यांचे अस्तित्व नकोसे झाले होते. इंद्राणी आणि तिच्या या दोन मुलांमध्ये मालमत्तेबाबतही वाद सुरू होते. इंद्राणीचा सावत्र मुलगा राहुलसोबत शीनाचे संबंध होते. ही बाबही तिला वारंवार खटकत असल्याचेही श्‍यामवरने न्यायालयात सांगितले. 

शामवरचा 6 सप्टेंबर 2015 ला जबाब पोलिसांनी नोंदविला आहे. त्यानुसार, 24 एप्रिल 2012 रोजी संध्याकाळी 4 वाजताच्या सुमाराला शीनाची हत्या केल्याचे त्याने न्यायालयाला सांगितले. 

विधीला रडू कोसळले 
सुनावणीसाठी न्यायालयात असलेल्या इंद्राणी आणि पीटर मुखर्जीला पाहून त्यांची मुलगी विधीला अश्रू अनावर झाले. सुनावणी सुरू होण्याआधीपासून विधी न्यायालयात उपस्थित होती. आईवडिलांची अवस्था पाहून तिला रडू येत होते. शेवटी तिला दोघांशीही थोडा वेळ बोलू द्यावे, अशी विनंती वकिलांनी न्यायालयात केली. न्यायालयाने ही परवानगी दिली. आजची सुनावणी संपल्यानंतर विधीला इंद्राणी आणि पीटरशी न्यायालयातच बोलण्याची परवानगी दिली. 

Web Title: maharashtra news Sheena Bora massacre